Saturday, 19 August 2017

...नांदगावकरांचा अखेरचा प्रवासही सुखकर नाही.

...नांदगावकरांचा अखेरचा प्रवासही सुखकर नाही.

नांदगाव : संदीप जेजुरकर

    '' इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...'' या कवी सुरेश भटांच्या कवितेतून माणसाचे जिवन खर तर खूपच खडतर आहे..मृत्यूनंतरच त्यातून सुटका होते याचा प्रत्यय येतो.. मात्र माणसाच्या मृत्युनंतरही सुटका नशिबी नसल्याचा प्रत्यय सध्या नगरपरिषद आरोग्य विभागाच्या अक्षम्य अशा दुर्लक्षामुळे नांदगावकरांना येत आहे.." काल ( दि.१६ ) जेष्ठ पत्रकार तथा गणेश न्यूज एजन्सीचे संचालक गजानन ( बापू ) आहेर यांच्या अंत्यविधी प्रसंगी अनुभवायास मिळाले..स्मशानभूमीत वीजपुरवठा नसल्याने  गडद असलेल्या अंधारात अंत्यविधी करण्याची वेळ आहेर कुटुंबियावर आली..मोबाईलच्या फ्लॅश लाईटमध्ये अंत्यविधी उरकावा लागला.. अंत्यविधीसाठी आलेल्या अनेकांना ते खटकले सुद्धा.. अंत्यविधीप्रसंगी गेलेल्या व्यक्तीच्या चांगल्या वाईट गुणांची चर्चा करत स्मशानभूमीत निरोप दिला जातो. मात्र नांदगावच्या स्मशानभूमीची दुरावस्थेची चर्चा करत यावेळी अंत्यदर्शन करण्यात आले..वेळोवेळी समशानभूमीची स्वच्छता आवश्यक असते मात्र स्वच्छतेचा दूरदूरपर्यंत लवलेशही इथेही बघायला मिळाला नाही..अंत्यदर्शनाप्रसंगी बसण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्ये मोठमोठाले गवत उगवलेले आहे.बसण्यासाठी कमी मात्र गवताने मोठी जागा तेथे व्यापलेली आहे..परिणामी या गवतामुळे डासांचा मोठा प्रादुर्भाव स्मशानाभूमीत जाणवला.. या डासांच्या त्रासामुळे अंत्यदर्शनासाठी जमलेल्या शोकाकुल जनतेची चुळबुळ सारं काही अलबेल नसल्याचे सांगत होती..मृतदेहाला अग्नी डाग देण्यापूर्वी लाकडे रचण्यासाठी कठडे नाही. पाणी योजना तिथे राबविलेली नसल्याने अंत्यविधी प्रसंगी हातपंपावरील पाण्याचा वापर करावा लागतो.उन्हाळ्यात या हातपंपास पाणी नसल्याने देखील मोठी गैरसोय होते. कायमस्वरुपी वीज पुरवठा नसल्याने दिवाबत्तीची सोय नाही.अशा अनेक नागरी सुविधांचा अभाव या स्मशानाभूमीत जाणवतो. अंत्यसंस्कारासाठी  जाणाऱ्या रस्त्यावरील विवेक हॉस्पिटल मागील शाकंबरी नदीवरील पुलाची झालेली दुरावस्था देखील नसल्याचे अधोरेखित करते.नगरपरिषदेच्या विकास आराखड्यात स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शाकंबरी नदीवरील पुलाच्या कामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेले आहेत.मात्र शासन स्तरावरून निधीची मंजुरी नसल्याने पुलाचे हे काम रखडले असल्याचे समजले..दरम्यान मरणानंतरही मृदेहाला मरणासन्न अवस्था सहन करावी लागत असल्याने स्मशानभूमी दुरावस्थेकडे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

भोलेनगर स्मशानभूमीची दुरावस्था  -

शहरातील भोलेनगर येथील दुसऱ्या स्मशानभूमीची अवस्था देखील अशीच आहे.. अंत्यविधी सुरु असतांना छताचा काही भाग कोसळण्याचे प्रकार देखील भोलेनगर येथील स्मशानभूमीत घडले आहे. आजही स्मशानभूमीच्या छताला तडे गेले असल्याने छत कोसळण्याची शक्यता तिथे आहे. या स्मशानभूमीच्या कामास मध्यंतरी सुरुवात झाली होती खरी मात्र सध्या हे काम थांबलेले आहे..वेळेत काम न केल्याने संबंधित ठेकेदाराला परिषदेकडून नोटीस बजावल्याचे देखील समजते.       

स्मशानभूमीतील मरण यातना - 

अंत्यसंस्कारप्रसंगी ठेवण्यात येणाऱ्या मृतदेहास संरक्षण कठडे देखील नाही..

* स्मशानभूमीत कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्था नाही..हातपंप आहे मात्र उन्हाळ्यात त्यास पाणी नाही..  

* स्मशानभूमीत असलेल्या शौचालयाची दुरावस्था मोठे गवत त्यात वाढलेले आहे.. 

* अंत्यसंस्कारानंतर उरलेली रक्षा टाकण्यास जागा नसल्याने बाजूला कुठेतरी ती टाकली जाते.

* स्मशानभूमीतील कचरा ( तिरडीचे बांबू ,कपडे ) तिथेच बाजूला टाकला जात असल्याने मोठी अस्वच्छता..            



Friday, 18 August 2017

जागतिक छयाचित्रकार दिन...

आज जागतिक छायाचित्रकार दिन...

     छायाचित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर काल भटकंती करत असतांना एका छोट्याशा बोरीच्या झाडावर एक घरटे आढळले..नेहमीची सखोल चौकशी करण्याची सवय व घरट्यात काय आहे हे पाहण्याची औत्सुकता लागल्यानंतर..त्यात काय आहे हे बघण्यासाठी मोबाईल हातात घेवून पुढे सरसावलो असता त्यात छान असे एका पक्षाचे ३ अंडे दिसले...नेहमीप्रमाणे वेगळे काहीतरी टिपण्याची सवय असल्याने लगेचच मोबाईल क्लीक करून या घरट्याला व घरट्यातील अंड्यांना कैद केले.

- संदीप जेजुरकर,नांदगाव

Wednesday, 16 August 2017

खेळ कुणाला दैवाचा कळला..

खेळ कुणाला दैवाचा कळला...

        " ज्या वेळेस मी ह्या जगाचा निरोप घेईल त्या वेळेस माझ्या मुळे माझा वृत्तपत्र वाचक अडून राहणार नाही.." हे बापूंचे गमतीचे ठरलेले वाक्य..पण हे वाक्य खरे ठरवीत  ( दि.१६ ऑगस्ट ) वृत्तपत्रांना सुट्टी असलेल्या दिवशीच या जगाचा  गजानन ( बापू ) आहेर यांनी निरोप घेतला..वृत्तपत्र व्यवसायाशी त्यांची जुळलेली नाळ किती घट्ट होती यातून हे स्पष्ट होते..
           गणेश न्यूज एजन्सीचे संचालक तथा जेष्ठ पत्रकार गजानन ( बापू ) आहेर यांचे काल ( दि.१६ ) ऑगस्ट रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले..बापूंची exit मनाला काहीशी चटका लावून गेली..काल संपूर्ण दिवस त्या कुटुंबियांच्या अगदी जवळ असतांना त्यांना झालेले दुःख पाहून मन हेलावले..सकाळी 'बापू' गेल्याची बातमी समजली.. थोडा वेळ विश्वासच बसेना.. मात्र खात्री झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून निधनाची बातमी इतरत्र कळवली.. तेव्हापासून बापूंची विचारणा करणारे असंख्य कॉल माझ्याकडे सुरु झाले..ते सायंकाळी अंत्ययात्रा निघेपर्यंत सुरूच होते..नातेवाईक,मोठा मित्र परिवार व आपल्या वृत्तपत्र एजन्सी व्यवसायातून वाढवलेले संबंध असा सर्वांचा ओघ दिवसभर बापूंच्या घरी सुरूच होता..बापूंच्या सहवासातील अनेक आठवणी त्यांनी विशद केल्या..पत्रकार संजीव धामणे, पत्रकार भास्कर कदम यांच्या डोळ्यातील क्षणा क्षणाला ओघळणारे अश्रू तर सारं काही दुःख सांगून जात होते..तर रात्री उशिरा देखील अंत्ययात्रेत उपस्थित असलेला जनसागर त्यांच्या चांगुलपणाची जाणीव करून देत होता..अचानकपणे बापूंच्या जाण्याने संपूर्ण नांदगावकरांवर या दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे...
        अतिशय विनोदी स्वभाव असलेले मनमिळावू नेहमीच हसतमुख असणाऱ्या बापूंना..
भावपूर्ण श्रद्धांजली...!

- संदीप जेजुरकर,नांदगाव 

Friday, 11 August 2017

अशी झाली आमची ब्रम्हगिरी यात्रा...

...अशी झाली आमची ब्रम्हगिरी यात्रा.

- संदीप जेजुरकर,नांदगाव

     ब्रम्हगिरी प्रदक्षिणा पूर्ण करायची की ब्रम्हगिरी पर्वत पादाक्रांत करायचा या विवंचनेत असतांनाच सन २००० ते २०१५ या कार्यकाळात सलग १५ वेळा ब्रम्हगिरी प्रदक्षिणा ( फेरी ) पूर्ण केल्याने यंदा ब्रम्हगिरी पर्वत गाठायचा असं ध्येय निश्चित करून निघालो..आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन कुशावर्त कुंडावर नमस्कार करून स्वारी 'ब्रम्हगिरी' च्या दिशेने निघाली..ब्रम्हगिरी पर्वतावर चढाई करण्यास ज्या ठिकाणावरून सुरुवात होते ते महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या ' 'संस्कृती रिसॉर्ट' येथे मस्त वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेत आम्ही सकाळी ९:१५ वा.ब्रम्हगिरीच्या दिशेने निघालो..सुरुवातीस थोडासा सिमेंट काँक्रीटचा रस्ता असल्याने अगदी आनंदात चालत होतो.. इतक्यात आमच्या गावाकडील काही मंडळी भेटली..'जय भोले'चा गजर करत माझ्याकडे असलेल्या कॅमेऱ्यात सर्वांचा एकत्रित फोटो काढत पुढे निघालो..पुढे पुढे सरकत असतांना वन विभागाच्या हद्दीला सुरुवात झाली..सगळीकडे हिरवेगार असे कधीही न पाहिलेले वेगवेगळे वृक्ष दिसू लागले.वनविभागाची माहिती देणारेे सूचना  फलक त्याच बरोबर 'हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग पांथस्ता दिसतो कसा ब्रम्हगिरीचा घाट.' , 'जागे व्हा कोमजते आहे धरणी माय..दुष्काळी क्षेत्र पसरवते आहे आपलेच पाय..' ,' प्रदूषणावर तोडगा काय..वनसंपत्ती हाच उपाय..' हे वन संपत्ती जोपासा असा संदेश देणारे घोषवाक्ये व वन्यप्राणी व विविध पक्षांची माहिती देणारे फलक ब्रम्हगिरी पर्वत सर करणाऱ्या भाविक व पर्यटकांचे लक्ष वेधून घेत होते..निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवत तसेच वनसंपतीची जपवणूक करणारे फलक आनंदाने वाचत पुढची वाटचाल सुरु झाली..ब्रम्हगिरी ३.६ कि.मी. असा डाव्या बाजूला असलेला फलक नजरेस पडला आणि आता एवढं अंतर आपल्याला कापायचं आहे असा विचार करून थोडीशी विश्रांती घेत पुन्हा पुढे पाऊल टाकत निघालो..रस्ता हळू हळू उंच व्हायला लागल्याने आता मात्र ब्रम्हगीरीची चढाई सुरु झाली याचा अंदाज यायला लागला..आमच्या सारखे अनेक भाविक व पर्यटक ब्रम्हगिरी पर्वत सर करत होते त्यात काही कुटुंब तर काही विद्यार्थ्यांच्या सहली एन्जॉय करत निघाल्या होत्या..अधून मधून निसर्ग सौंदर्य खुलविणारे लहान धबधबे दिसायला लागले.मग काय कॅमेऱ्यात व मोबाईल मध्ये धबधब्याचे क्षण कैद केले आणि पुढे निघालो..दगडात कोरलेल्या उंच उंच पायऱ्यांना आता सुरुवात झाली होती..थोडंसं अजून पुढे चालत गेल्या नंतर 'मुक्ताई मंदीर' लागले त्यात दर्शन घेवून पुन्हा पुढे चालू लागलो.दगडात कोरलेलं हनुमान जी..तसेच अनेक देवदेवतांच्या मुर्त्या न्याहाळत पुढे सरकत होतो..याच दरम्यान अनेक छोटे छोटे व्यावसायिक निंबू शरबत, काकडी,चहा बिस्कीट आदींची दुकाने थाटून येणाऱ्या भाविकांना आस्वाद घेण्याचा आग्रह धरत होते..थोडंसं अजून पुुढे काही अंतर चालून गेल्यानंतर उंच अशा डोंगरातील दगडांमध्ये कोरलेल्या पायऱ्या सुरु झाल्या..अतिशय कमी अंतरात तयार केलेल्या या पायऱ्यांमध्ये भाविकांची गर्दी होऊ लागली..ब्रम्हगिरी सर करतांना आता मात्र थकवा जाणवू लागला..तोच पावसाच्या संततधार अशा शिडकाव्याला सुरुवात झाली..मनाला हवाहवासा वाटणाऱ्या शिडकाव्याने व भाविकांनी बम बम भोलेचा आसमंत गाजवणारा गजर केल्याने आलेला थकवा दूर पळून गेला..वानर राजाची स्वारी देखील याच ठिकाणी दाखल झाली..कुणी बिस्कीट तर कुणी चणे फुटाणे,शेंगदाणे या वानरांना देत पुढे निघालो..ज्यांनी काहीच दिले नाही त्यांच्या पिशव्या हिसकावून घेत इथे आपलीच दादागिरी चालत असल्याचा प्रत्यय या वानर राजांनी गुर गुर करत दिला..दगडातील कोरलेल्या पायऱ्या पूर्ण करीत पुढे निघाल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक टोळकं भेटलं.." भोले का प्रशाद है..एक कश मारलो..आगे जा के कठीणायी नहीं होंगी.." असे म्हणत 'जय भोले शंकर'चा नारा लावत जोरदार गांजाचा कश मारत धुराळा सोडला..थोडंसं पुढे चालून गेल्यानंतर ब्रम्हगिरीचा माथा दिसू लागला..उंच अशा माथ्यावर मंद असा वारा व धुक्यांनी चहू बाजूंनी व्यापलेला अथांग असा ब्रम्हगिरी पाहून मनाचे समाधान झाले..याच माथ्यावरून चहू बाजूंनी उंच उंच अशा डोंगररांगामध्ये संपूर्ण त्र्यंबकेश्वराचे मनोहारी वेढलेले रूप दिसू लागले..एकीकडे गोदावरी उगमस्थान व ब्रम्हगिरी मंदिर व दुसरीकडे भगवान शंकराने जटा आपटलेले स्थान असे दोन्ही मंदिरे दिसत असताना आम्ही मात्र गोदावरीच्या उगम स्थानाकडे जाण्याचा रस्ता धरला..निमुळता निसटता मार्ग असल्याने हळुवार पाय टाकत ब्रम्हगिरी मंदिराजवळ पोहोचलो..दर्शनासाठी मोठी गर्दी तिथे पाहायला मिळाली..गौतम ऋषीचे तपस्यास्थान असलेल्या ब्रम्हगिरी मंदिराचे मुख्य दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच असलेले मूळगंगा ( गोदावरीचे उगमस्थान ) बघितले..छोट्या छोट्या दगडातील कोरीव मुर्त्या शिवलिंग व त्यावर थाटलेले पूजेचे आकर्षक असेलेले बिल्वपत्र,रंगीबेरंगी फुले मनमोहुन टाकत होते..याच ठिकाणी स्थानिक पुरोहित उगम स्थानातील जल घेऊन मूर्तीवर अभिषेक करून देत होते..वानर राजांची स्वारी इथेही दिमतीला हजरच होती..राजगिरा लाडू त्यांना देत तिथून त्यांचा निरोप घेत भगवान शंकराने आपटलेल्या जटा मंदिराकडे आगेकूच केली..डोंगराच्या कडे कडेने चालत असतांना सखोल असलेल्या दरीचे दर्शन होते..ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मारत असलेल्या भाविकांचे विहंगम असे दृश्य या ठिकाणावरून मस्त दिसत होते..ते दृश्य कॅमेऱ्यात कैद करत पुढे निघालो..पुढील मार्गक्रमण करत असतांना डोंगरावर उगवलेली गवतांमधील छोटी छोटी सफेद रंगाची रानफुले खुणावत होती..तर मनातील सुप्त इच्छा पूर्ण व्हावी यासाठी छोटे छोटे दगड एकमेकांवर रचून मस्त अशी रास लावलेली बघायला मिळाली..ते बघून लहानपणी खेळत असलेल्या लंगूर ( लिंगोरच्या ) खेळाची आठवण झाली..तिथून पुढे निघाल्यानंतर भगवान शंकरांनी गोदावरी नदीचा प्रवाह बदलण्यासाठी जिथे जटा आपटल्या त्या शिवजटा मंदिरात जाऊन पोहोचलो..भगवान शंकराने टेकवलेले गुडघ्यांचे निशाण व डोक्यावरील आपटलेल्या जटा यांच्या खुणा यांचे दर्शन घेतले..हळू हळू आता पुन्हा परतीचा प्रवास सूरु झाला निसटता डोंगर असल्याने दगडांचा आधार घेत परतीच्या प्रवासाचे मार्गक्रमण सुरु झाले..पुढे जावून गंगा दरवाजाकडे देखील जायचे होते..पुन्हा एकदा गंंगा दरवाजाकडे जातांना दगडी पायऱ्या सुरु झाल्या थकवा तर खूप आला होता पण मनाची समजूत घालत अजून थोडंसं बाकी आहे असे म्हणत गंगा द्वार गाठले..फुलांचे हार विक्री करत असलेल्या माता भगिणींचा हार घेण्यासाठीचा आग्रह सुरु होता..तीन मुर्त्या आहेत १० रुपयात तीन हार घ्या..असा सूर त्यांनी लावला होता..गंगा द्वाराचे दर्शन घेवून डोंगराच्या कडेने थोडेसे पुढे वर चालल्या नंतर गोरक्ष गुफेचे दर्शन घेतले..आता खऱ्या अर्थाने परतीचा प्रवास सुरु झाला..पायऱ्या उतरत असतांना वाटेमध्ये पुन्हा श्रीराम कुंड व लक्ष्मण कुंडाचे दर्शन झाले..प्रभू रामचंद्र वनवासासाठी या स्थानावर आले असता आपल्या पितरांच्या श्राद्ध विधीसाठी औदूंबर वृक्षास बाण मारून गोदावरीचे पवित्र जल प्रवाहित केले होते.म्हणून या ठिकाणास राम तीर्थ म्हणून ओळखले जाते असा फलक या रामकुंडावर दर्शनी भागास लावलेला होता..रामकुंड व लक्ष्मण कुंड यांचे दर्शन घेवून मग आम्ही परतीचा प्रवास करत करत ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी उतरलो..खूप सुंदर आणि मनसोक्त अशी भटकंती करतांना परमेश्वराचे दर्शन झाल्याने मन समाधान झाले..पुनश्च एकदा आपल्या मित्रांसोबत ब्रम्हगिरीवर येऊन मनसोक्त अशी भटकंती करावी अशी इच्छा मनी बाळगून आमची ब्रम्हगिरी यात्रा संपवली..

- संदिप जेजुरकर,नांदगाव ( नाशिक )

Monday, 31 July 2017

भरकटलेला...' कुदळ्या पक्षी '

नांदगाव : संदीप जेजुरकर
           काल ( दि.३१ ) श्री.बाळासाहेब गायकवाड,मोठी होळी नांदगाव ( नाशिक )  यांच्या घरावर जखमी अवस्थेत हा 'एक अनाहुत पक्षी' आढळला..अनेकदा त्याने उडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या पंखात उडण्याचं बळ नसल्याने तो उडू शकत नव्हता...वनविभागाच्या सूर्यवंशी दादा,सुनील खंदारे,गोपाल राठोड यांना बोलावून या पक्ष्याला त्यांच्या ताब्यात दिले..पक्षी प्रेमी व सर्प मित्र असलेल्या दिपक घोडेराव यांना बोलावून त्यांच्याकडून या पक्षाविषयी माहिती घेतली असता  त्यांनी त्या पक्षाची ओळख " कुदळ्या पक्षी "अशी सांगत त्यांचे खाद्य मासे किंवा पाण्यातील छोटे किटक असल्याचे सांगितले त्यानंतर पशु वैद्यकीय दवाखान्यात त्या पक्ष्यास उपचारासाठी नेल्यानंतर प्राथमिक तपासणीत त्याला कुठेही जखमा आढळल्या नाही परंतु अशक्तपणा आल्याने त्यास ग्लुकोज अथवा काहीतरी खायला द्यावे लागेल असे डॉ.सांगितले..लागलीच वनविभागाच्या सूर्यवंशी दादा व सुनील खंदारे,गोपाल राठोड यांनी त्यास खाद्य म्हणून मासे व ग्लुकोजची उपलब्धता करून देत वनविभागाच्या एका कार्यालयात सुरक्षितरीत्या ठेवत त्याचा मस्त पाहुणचार केला...

पक्षी प्रेमी व सर्प मित्र असलेल्या दिपक घोडेराव यांनी कुदळ्या पक्षी विषयी दिलेली माहिती...

कुठल्याही गावाच्या, शहराच्या बाहेरा तलावाजवळ,जिथे पाणथळीची जागा असेल तर तिथे हे हमखास आढळणार...आपल्याकडे आढळणारा 'काळा कुदळ्या' हा आकाराने मोठा असतो. त्याचा रंग जरी काळा असला तरी त्याच्या पंखांवर झळाळणाऱ्या रंगाची झाक असते. याच्या खांद्यावर पांढऱ्या रंगाची पिसे असतात तर डोक्यावर गडद लाल धब्बा असतो..कुदळ्यांच्या चोची लांब, खाली वाकलेल्या आणि एखाद्या कुदळीच्या पात्यासारख्या असतात. ह्या लांब आणि वक्राकार चोचीमुळे त्यांना चिखलाच्या आत दडलेले प्राणी, खेकडे, मासे पकडणे सोपे जाते..

- संदीप जेजुरकर
नांदगाव ( नाशिक )  


Tuesday, 21 March 2017

सत्तेसाठी कायपण...

...सत्तेसाठी कायपण

अभिनंदन...
सर्वच राजकीय पक्षांचे...

एखाद्या चांगल्या मुद्द्यासाठी ( शेतकऱ्यांच्या हितावह असलेले मुद्दे ) कधीही एकत्र न येणारे सर्व राजकीय पक्ष ' जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष ' निवडीच्या निमित्ताने सत्तेसाठी पक्षाचे ध्येय धोरणे,विचार व निवडणुकीत एकमेकांवर मोठी चिखलफेक करून जनतेची दिशाभूल करणारे 'धुरीण' एक अभद्र युती करून मात्र एकत्र झाले..
मजहब नही सिखाता आपस मैं बैर रखना..( जातीभेद वगळून पक्षभेद बाजूला करत ) कदाचीत या ओळीं या निमित्ताने अधोरेखित करत सत्तेसाठी का होईना मनोमिलन झालेले दिसतंय..

पुनश्च एकदा सर्वच राजकीय पक्षांचे मनापासून अभिनंदन...

संदीप जेजुरकर..
नांदगाव ( नाशिक )

Wednesday, 8 March 2017

जागतिक महिला दिन व आईचे मातृत्व...!

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
जागतिक महिला दिन...

       " विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा आपल्या कार्यातून उमटविणाऱ्या महिलांच्या सन्मानाचा आजचा हा दिवस.." !
       सर्व प्रथम संपूर्ण नारी शक्तीला प्रणाम...!

         आजच्या या दिवसाचे औचित्य साधून खूप काही लिहावेसे वाटते..अनेक स्त्रिया व त्यांचे अधोरेखित असलेले समाजकार्य जे डोळ्याने बघितलेले अनुभवलेले ते समाजापुढे मांडावे अशी मनातली सुप्त इच्छा.. पण यापलीकडे जावून एका 'आईची अवस्था व तिच्यावर ओढावलेला बाका प्रसंग ' मला आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने लिहायचा आहे..जी आई आपल्या पोटच्या गोळ्याला मागच्या चार दिवसापासून मरणासन्न अवस्थेत मृत्यूशी झुंज देतांना एकटक बघत आहे..प्रसंग तसा हृदय हेलावून टाकणाराच..या सर्व प्रसंगाचा मी स्वतः साक्षीदार आहे..
         वय वर्षे ७ असलेल्या या मुलाच्या अंगा खांद्यावर खेळण्या बागडण्याच्या वयात त्याला एका मोठ्या आजाराने ग्रासले..खेळत असतांना डोळ्यांची नजर एका क्षणात तिरपी होवून गेल्याने त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल केले..काही तपासण्या केल्यानंतर 'त्या' चिमुरड्याला एका मोठ्या आजाराने ग्रासले असल्याचे लक्षात आले..मुलाच्या आई वडिलांवर तर क्षणभर आभाळच कोसळले..अशा अवस्थेत काय निर्णय घ्यावा हेच त्यांना कळेना..जसा आजार मोठा तसा त्याच्या खर्चाचा आवाका हि मोठाच..अनेक देवदेवतांवर त्या माऊलीची श्रद्धा..सुरुवातीला तर त्यांना विश्वासच बसेना..पण संकट तर ओढावलेलेच..मार्ग तर काढावाच लागेल..आलेल्या संकटावर मात करण्यासाठी मग त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु झाली...नाशिक येथील एका नामवंत रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले..आजाराचे स्वरूप ओळखून डॉक्टरांनी मुलाच्या वडिलांना त्याचं आयुष्यमान किती व कसे आहे याची पुसटशी कल्पनाही दिली..मुलाची आई मात्र निमूटपणे हे सर्व ऐकत होती..नेमकं काय चालले आहे तिला काहीच समजत नव्हते..फक्त आपला मुलगा लवकर कसा बरा होईल व त्यावर उपचार कसे करावे लागतील हेच फक्त तिच्या डोळ्यासमोर फिरत होते..डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी दिड महिण्यांचा कालावधी लागणार होता..उपचार म्हणजे प्रयोगच होते त्याच्यावर ते..आपल्या मुलाचे आयुष्यमान वाढावे..यासाठी अगदी एकही दिवस खाडा न करता या माऊलीने व त्याच्या जन्मदात्याने रोज एका बाजूने शंभर किलोमीटरचा प्रवास करत ही उपचारपद्धती पूर्ण केली..उपचार पूर्ण झाल्या नंतर त्याचा परिणाम हा एक ते दीड महिण्याने दिसतो..त्यासाठी फक्त आता वाट पाहावी लागणार होती..एक एक दिवस मोजत तो महिना संपण्याची वाट बघत असतांना एक दिवस पुन्हा त्या चिमुरड्याची तब्येत अचानक बिघडली व तो पुन्हा अंथरुणाला खिळला..मुंबई येथे  या आजारावर चांगले उपचार होवून तो पूर्ण बरा होईल असा सल्ला देतांना राजकारणातील व सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या हस्ती याच डॉक्टरने बऱ्या केल्याचा दाखला देत त्याकडेच पुढील उपचार करा असा सल्ला मिळाल्याने भाबडी आशा बाळगून या मुलाच्या मात्या - पित्याने थेट मुंबई गाठली..तिथलं सगळं विश्वच मात्र न्यारं होतं..डॉक्टरांना भेटायला सायंकाळची वेळ ठरली..तोपर्यंत काय करायचे म्हणून त्या मात्या पित्याने त्याला मुंबई स्थित राणीच्या बागेचे दर्शन घडविले..मनमोकळ्या व स्वच्छंदीपणे राणीच्या बागेत  'तो' बागडू लागला...त्याच प्रसन्न वातावरणात डॉक्टरांना भेटण्याची वेळ आली..मोठ्या आशेने डॉक्टरांना भेटल्यानंतर मात्र पदरी निराशाच पडली..उपचाराची फाईल बघून डॉक्टरांनी मी यावर उपचार करू शकत नाही म्हणून उपचार करण्यास असमर्थता दाखविली..पण मोठी आशा बाळगून आलेल्यांना मी काहीच करू शकलो नाही अशी खंत असलेल्या त्या डॉक्टरने माणुसकी दाखवत 'फी' चे पैसे देखील परत केले..ज्याच्याकडून आशा होती त्याकडूनही भ्रमनिरास झाल्याने हतबल होवुन परतीचा प्रवास करत घर गाठले..दरम्यानच्या काळात 'त्या' ची प्रकृती ढासळतच चालली होती..जिथे त्या मुलाची व आईची श्रद्धा होती तिथेच आता माथा टेकवून विनवणी करायची..लेकराला बरं कर म्हणून हात जोडायचे हा पर्याय आता त्यांच्यापुढे उरला होता..त्यानुसार कोकणातील मोठे प्रस्थ असलेल्या श्रद्धा स्थानाकडे जाण्याची त्यांनी वाट धरली..किमान आधार मिळावा अशी अपेक्षा बाळगून तिथपर्यंत पोहोचलेल्या स्वामी चरणी ही पदरी निराशाच पडली..या सर्व कालावधीत मुलगा बरा होईल म्हणून मांत्रिकाचा ही आधार घेतला मात्र जिथे डॉक्टरी उपचार देखील उणे पडत होते तिथे लिंबू व भस्म काय करणार..हे सारं काही सुरु असतांना त्या चिमुरड्याची आई मात्र स्तब्ध होवून लेकराला मांडीवर घेवून फक्त बघत होती..या सर्व गोष्टी करत महिण्याभराचा कालावधी लोटला..पून्हा एकदा तपासणी करून नाशिक येथील केलेल्या उपचाराचे फलित बघायचे होते..तपासणी पूर्ण झाली..कुठेतरी सकारात्मक रिपोर्ट येवून 'तो' बरा होतोय असा अगम्य आशावाद उराशी बाळगून डॉक्टरकडे रिपोर्ट दाखविल्याने सुरुवातीस उपचारास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितल्यानंतर एक समाधानाची व हास्याची लकिर त्या दोन्ही मायबापांच्या चेहऱ्यावर उमटली..मात्र म्हणतात सुखाचे क्षण फक्त काहीच क्षणच असतात. त्याचप्रमाणे लागलीच डॉक्टरने दुसरी तपासणी करावी लागेल असे सांगितले..पाठीच्या कण्यातून सँपल घेत दुसरी तपासणी पार पडली. मात्र यात पुन्हा एकदा आजार कमी होण्याऐवजी बळावल्याचे डॉक्टरांनी सांगितले..पुन्हा पुढील उपचारास सामोरे जावे लागणार असल्याने पुढची तारीख घेवून त्यानुसार पैशाची अडजस्टमेंट करण्यासाठी आई बापाची धावपळ सुरू झाली...मध्यंतरीच्या काळात मात्र 'त्या'ची तब्येत पुन्हा जास्त खालावली..हृदयाची ठोके कमी होत चालली असतांना मुलाने आई वडिलांशी सुरु असलेला संवादही बंद केला..एकटक फक्त तो आई वडिलांकडे बघत होता..देवदूत म्हणून लाभलेल्या डॉक्टरकडे मग त्याला दाखल करण्यात आले..काय झालं हे बघण्याअगोदरच 'त्या' सात वर्षीय चिमुरड्याला झटके येऊ लागले..यमाच्या दारातून अनेक रुग्णांना ओढून आणणाऱ्या त्या 'देवदूता'ने मग उपचार प्रक्रिया सुरु केली..दिवसभर उपाशी तापाशी त्या मुलासाठी संपूर्ण टीम उभी ठेवत त्याला मृत्यूच्या दारातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले..एकिकडे स्वतावर बाका प्रसंग उभ्या असलेल्या त्या डॉक्टरला भेटण्यासाठी स्वताची आई आलेली असतांना मात्र या आईचे दुःख तो बघू शकत नव्हता..ते दुःख त्याला डोळ्या समोर दिसत असतांना उपचार व शर्तीचे प्रयत्न करून 'त्या' चिमुरड्याला त्या अवस्थेतून बाहेर काढतांना...मृत्यूशी सुरु असलेली त्याची झुंज पाहत मात्या पित्याचे अश्रू घळा घळा वाहत होते..ते पाहण्या खेरीज दुसरा पर्यायही त्यांच्याकडे शिल्लक नव्हताच..आयुष्या सोबत त्याची सुरु असलेली ही लढाई उघड्या डोळ्याने पाहतांना अनेकांचे काळीज या घटनेने हेलावून जात होते..हॉस्पिटल मधील रुग्ण,उपचार करणारे डॉक्टर व परिचारिका,जमलेला मित्र परिवाराच्या डोळ्यांच्या कडा देखील हे दृश्य बघून पाणावलेल्या होत्या..त्या आईला मात्र पोटच्या गोळ्याचे सूरु असलेले हाल पाहवत नव्हते.. त्याच्यासाठी काय करू आणि काय नाही असे तिला झाले होते..उपचार संपले..डॉक्टरांनी तो आता धोक्यातून सध्यातरी बाहेर असल्याचे सांगितले..त्याची आई 'त्या' चिमुरड्याजवळ गेली डोक्यावरून मायेचा हात फिरवत 'उठ रे बाळा माझ्याशी काहीतरी बोल ' अशी आर्त हाक देत त्याचा मुका घेत त्याला गोंजारू लागली..बापाचा तर जीव इकडे टांगणीलाच लागलेला होता..धोका जरी टळला होता मात्र पुढील तीन दिवस त्या मुलाची तरफड मात्र सुरूच होती..एकटी आई त्याचे डोके आपल्या मांडीवर घेऊन अश्रू ढाळतांना उसासे सोडत फक्त एकटक बघत होती..मागील तीन दिवसांच्या उपचारांनंतर आज अखेर 'त्या' मुलाने आपल्या जन्मदात्रीला हाक दिली आहे..तो आता त्याच्या आईला ओळखू लागला आहे..पुढील आयुष्य जगण्याचे संकट त्याच्यावर आजही कायम आहे..
         एका आईचे शर्थीचे प्रयत्न फळास आले होते.. देवदूत म्हणून लाभलेल्या 'त्या' डॉक्टरने केलेल्या अथक परिश्रमाननंतर 'त्या' चिमुरड्याला पुढील काही काळ जीवनदान मिळाले आहे..! जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने मनात एक विचार उसळी मारून वर येत आहे की कसं असते ना आईचे मन की जे सतत लेकरांच्या ठायी असते..ती जेव्हा आई होते तेव्हा तिला स्वतःचे असे अस्तित्व उरतच नाही..

अशा समस्त मातांना आजच्या ' जागतिक महिला दिनानिमित्त ' माझे विनम्र अभिवादन..!

  ...संदीप जेजुरकर,नांदगाव ( नाशिक )

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶