🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
जागतिक महिला दिन...✏
" विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा आपल्या कार्यातून उमटविणाऱ्या महिलांच्या सन्मानाचा आजचा हा दिवस.." !
सर्व प्रथम संपूर्ण नारी शक्तीला प्रणाम...!
आजच्या या दिवसाचे औचित्य साधून खूप काही लिहावेसे वाटते..अनेक स्त्रिया व त्यांचे अधोरेखित असलेले समाजकार्य जे डोळ्याने बघितलेले अनुभवलेले ते समाजापुढे मांडावे अशी मनातली सुप्त इच्छा.. पण यापलीकडे जावून एका 'आईची अवस्था व तिच्यावर ओढावलेला बाका प्रसंग ' मला आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने लिहायचा आहे..जी आई आपल्या पोटच्या गोळ्याला मागच्या चार दिवसापासून मरणासन्न अवस्थेत मृत्यूशी झुंज देतांना एकटक बघत आहे..प्रसंग तसा हृदय हेलावून टाकणाराच..या सर्व प्रसंगाचा मी स्वतः साक्षीदार आहे..
वय वर्षे ७ असलेल्या या मुलाच्या अंगा खांद्यावर खेळण्या बागडण्याच्या वयात त्याला एका मोठ्या आजाराने ग्रासले..खेळत असतांना डोळ्यांची नजर एका क्षणात तिरपी होवून गेल्याने त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल केले..काही तपासण्या केल्यानंतर 'त्या' चिमुरड्याला एका मोठ्या आजाराने ग्रासले असल्याचे लक्षात आले..मुलाच्या आई वडिलांवर तर क्षणभर आभाळच कोसळले..अशा अवस्थेत काय निर्णय घ्यावा हेच त्यांना कळेना..जसा आजार मोठा तसा त्याच्या खर्चाचा आवाका हि मोठाच..अनेक देवदेवतांवर त्या माऊलीची श्रद्धा..सुरुवातीला तर त्यांना विश्वासच बसेना..पण संकट तर ओढावलेलेच..मार्ग तर काढावाच लागेल..आलेल्या संकटावर मात करण्यासाठी मग त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु झाली...नाशिक येथील एका नामवंत रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले..आजाराचे स्वरूप ओळखून डॉक्टरांनी मुलाच्या वडिलांना त्याचं आयुष्यमान किती व कसे आहे याची पुसटशी कल्पनाही दिली..मुलाची आई मात्र निमूटपणे हे सर्व ऐकत होती..नेमकं काय चालले आहे तिला काहीच समजत नव्हते..फक्त आपला मुलगा लवकर कसा बरा होईल व त्यावर उपचार कसे करावे लागतील हेच फक्त तिच्या डोळ्यासमोर फिरत होते..डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी दिड महिण्यांचा कालावधी लागणार होता..उपचार म्हणजे प्रयोगच होते त्याच्यावर ते..आपल्या मुलाचे आयुष्यमान वाढावे..यासाठी अगदी एकही दिवस खाडा न करता या माऊलीने व त्याच्या जन्मदात्याने रोज एका बाजूने शंभर किलोमीटरचा प्रवास करत ही उपचारपद्धती पूर्ण केली..उपचार पूर्ण झाल्या नंतर त्याचा परिणाम हा एक ते दीड महिण्याने दिसतो..त्यासाठी फक्त आता वाट पाहावी लागणार होती..एक एक दिवस मोजत तो महिना संपण्याची वाट बघत असतांना एक दिवस पुन्हा त्या चिमुरड्याची तब्येत अचानक बिघडली व तो पुन्हा अंथरुणाला खिळला..मुंबई येथे या आजारावर चांगले उपचार होवून तो पूर्ण बरा होईल असा सल्ला देतांना राजकारणातील व सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या हस्ती याच डॉक्टरने बऱ्या केल्याचा दाखला देत त्याकडेच पुढील उपचार करा असा सल्ला मिळाल्याने भाबडी आशा बाळगून या मुलाच्या मात्या - पित्याने थेट मुंबई गाठली..तिथलं सगळं विश्वच मात्र न्यारं होतं..डॉक्टरांना भेटायला सायंकाळची वेळ ठरली..तोपर्यंत काय करायचे म्हणून त्या मात्या पित्याने त्याला मुंबई स्थित राणीच्या बागेचे दर्शन घडविले..मनमोकळ्या व स्वच्छंदीपणे राणीच्या बागेत 'तो' बागडू लागला...त्याच प्रसन्न वातावरणात डॉक्टरांना भेटण्याची वेळ आली..मोठ्या आशेने डॉक्टरांना भेटल्यानंतर मात्र पदरी निराशाच पडली..उपचाराची फाईल बघून डॉक्टरांनी मी यावर उपचार करू शकत नाही म्हणून उपचार करण्यास असमर्थता दाखविली..पण मोठी आशा बाळगून आलेल्यांना मी काहीच करू शकलो नाही अशी खंत असलेल्या त्या डॉक्टरने माणुसकी दाखवत 'फी' चे पैसे देखील परत केले..ज्याच्याकडून आशा होती त्याकडूनही भ्रमनिरास झाल्याने हतबल होवुन परतीचा प्रवास करत घर गाठले..दरम्यानच्या काळात 'त्या' ची प्रकृती ढासळतच चालली होती..जिथे त्या मुलाची व आईची श्रद्धा होती तिथेच आता माथा टेकवून विनवणी करायची..लेकराला बरं कर म्हणून हात जोडायचे हा पर्याय आता त्यांच्यापुढे उरला होता..त्यानुसार कोकणातील मोठे प्रस्थ असलेल्या श्रद्धा स्थानाकडे जाण्याची त्यांनी वाट धरली..किमान आधार मिळावा अशी अपेक्षा बाळगून तिथपर्यंत पोहोचलेल्या स्वामी चरणी ही पदरी निराशाच पडली..या सर्व कालावधीत मुलगा बरा होईल म्हणून मांत्रिकाचा ही आधार घेतला मात्र जिथे डॉक्टरी उपचार देखील उणे पडत होते तिथे लिंबू व भस्म काय करणार..हे सारं काही सुरु असतांना त्या चिमुरड्याची आई मात्र स्तब्ध होवून लेकराला मांडीवर घेवून फक्त बघत होती..या सर्व गोष्टी करत महिण्याभराचा कालावधी लोटला..पून्हा एकदा तपासणी करून नाशिक येथील केलेल्या उपचाराचे फलित बघायचे होते..तपासणी पूर्ण झाली..कुठेतरी सकारात्मक रिपोर्ट येवून 'तो' बरा होतोय असा अगम्य आशावाद उराशी बाळगून डॉक्टरकडे रिपोर्ट दाखविल्याने सुरुवातीस उपचारास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितल्यानंतर एक समाधानाची व हास्याची लकिर त्या दोन्ही मायबापांच्या चेहऱ्यावर उमटली..मात्र म्हणतात सुखाचे क्षण फक्त काहीच क्षणच असतात. त्याचप्रमाणे लागलीच डॉक्टरने दुसरी तपासणी करावी लागेल असे सांगितले..पाठीच्या कण्यातून सँपल घेत दुसरी तपासणी पार पडली. मात्र यात पुन्हा एकदा आजार कमी होण्याऐवजी बळावल्याचे डॉक्टरांनी सांगितले..पुन्हा पुढील उपचारास सामोरे जावे लागणार असल्याने पुढची तारीख घेवून त्यानुसार पैशाची अडजस्टमेंट करण्यासाठी आई बापाची धावपळ सुरू झाली...मध्यंतरीच्या काळात मात्र 'त्या'ची तब्येत पुन्हा जास्त खालावली..हृदयाची ठोके कमी होत चालली असतांना मुलाने आई वडिलांशी सुरु असलेला संवादही बंद केला..एकटक फक्त तो आई वडिलांकडे बघत होता..देवदूत म्हणून लाभलेल्या डॉक्टरकडे मग त्याला दाखल करण्यात आले..काय झालं हे बघण्याअगोदरच 'त्या' सात वर्षीय चिमुरड्याला झटके येऊ लागले..यमाच्या दारातून अनेक रुग्णांना ओढून आणणाऱ्या त्या 'देवदूता'ने मग उपचार प्रक्रिया सुरु केली..दिवसभर उपाशी तापाशी त्या मुलासाठी संपूर्ण टीम उभी ठेवत त्याला मृत्यूच्या दारातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले..एकिकडे स्वतावर बाका प्रसंग उभ्या असलेल्या त्या डॉक्टरला भेटण्यासाठी स्वताची आई आलेली असतांना मात्र या आईचे दुःख तो बघू शकत नव्हता..ते दुःख त्याला डोळ्या समोर दिसत असतांना उपचार व शर्तीचे प्रयत्न करून 'त्या' चिमुरड्याला त्या अवस्थेतून बाहेर काढतांना...मृत्यूशी सुरु असलेली त्याची झुंज पाहत मात्या पित्याचे अश्रू घळा घळा वाहत होते..ते पाहण्या खेरीज दुसरा पर्यायही त्यांच्याकडे शिल्लक नव्हताच..आयुष्या सोबत त्याची सुरु असलेली ही लढाई उघड्या डोळ्याने पाहतांना अनेकांचे काळीज या घटनेने हेलावून जात होते..हॉस्पिटल मधील रुग्ण,उपचार करणारे डॉक्टर व परिचारिका,जमलेला मित्र परिवाराच्या डोळ्यांच्या कडा देखील हे दृश्य बघून पाणावलेल्या होत्या..त्या आईला मात्र पोटच्या गोळ्याचे सूरु असलेले हाल पाहवत नव्हते.. त्याच्यासाठी काय करू आणि काय नाही असे तिला झाले होते..उपचार संपले..डॉक्टरांनी तो आता धोक्यातून सध्यातरी बाहेर असल्याचे सांगितले..त्याची आई 'त्या' चिमुरड्याजवळ गेली डोक्यावरून मायेचा हात फिरवत 'उठ रे बाळा माझ्याशी काहीतरी बोल ' अशी आर्त हाक देत त्याचा मुका घेत त्याला गोंजारू लागली..बापाचा तर जीव इकडे टांगणीलाच लागलेला होता..धोका जरी टळला होता मात्र पुढील तीन दिवस त्या मुलाची तरफड मात्र सुरूच होती..एकटी आई त्याचे डोके आपल्या मांडीवर घेऊन अश्रू ढाळतांना उसासे सोडत फक्त एकटक बघत होती..मागील तीन दिवसांच्या उपचारांनंतर आज अखेर 'त्या' मुलाने आपल्या जन्मदात्रीला हाक दिली आहे..तो आता त्याच्या आईला ओळखू लागला आहे..पुढील आयुष्य जगण्याचे संकट त्याच्यावर आजही कायम आहे..
एका आईचे शर्थीचे प्रयत्न फळास आले होते.. देवदूत म्हणून लाभलेल्या 'त्या' डॉक्टरने केलेल्या अथक परिश्रमाननंतर 'त्या' चिमुरड्याला पुढील काही काळ जीवनदान मिळाले आहे..! जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने मनात एक विचार उसळी मारून वर येत आहे की कसं असते ना आईचे मन की जे सतत लेकरांच्या ठायी असते..ती जेव्हा आई होते तेव्हा तिला स्वतःचे असे अस्तित्व उरतच नाही..
अशा समस्त मातांना आजच्या ' जागतिक महिला दिनानिमित्त ' माझे विनम्र अभिवादन..!
...संदीप जेजुरकर,नांदगाव ( नाशिक )
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
No comments:
Post a Comment