Friday, 11 August 2017

अशी झाली आमची ब्रम्हगिरी यात्रा...

...अशी झाली आमची ब्रम्हगिरी यात्रा.

- संदीप जेजुरकर,नांदगाव

     ब्रम्हगिरी प्रदक्षिणा पूर्ण करायची की ब्रम्हगिरी पर्वत पादाक्रांत करायचा या विवंचनेत असतांनाच सन २००० ते २०१५ या कार्यकाळात सलग १५ वेळा ब्रम्हगिरी प्रदक्षिणा ( फेरी ) पूर्ण केल्याने यंदा ब्रम्हगिरी पर्वत गाठायचा असं ध्येय निश्चित करून निघालो..आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन कुशावर्त कुंडावर नमस्कार करून स्वारी 'ब्रम्हगिरी' च्या दिशेने निघाली..ब्रम्हगिरी पर्वतावर चढाई करण्यास ज्या ठिकाणावरून सुरुवात होते ते महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या ' 'संस्कृती रिसॉर्ट' येथे मस्त वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेत आम्ही सकाळी ९:१५ वा.ब्रम्हगिरीच्या दिशेने निघालो..सुरुवातीस थोडासा सिमेंट काँक्रीटचा रस्ता असल्याने अगदी आनंदात चालत होतो.. इतक्यात आमच्या गावाकडील काही मंडळी भेटली..'जय भोले'चा गजर करत माझ्याकडे असलेल्या कॅमेऱ्यात सर्वांचा एकत्रित फोटो काढत पुढे निघालो..पुढे पुढे सरकत असतांना वन विभागाच्या हद्दीला सुरुवात झाली..सगळीकडे हिरवेगार असे कधीही न पाहिलेले वेगवेगळे वृक्ष दिसू लागले.वनविभागाची माहिती देणारेे सूचना  फलक त्याच बरोबर 'हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग पांथस्ता दिसतो कसा ब्रम्हगिरीचा घाट.' , 'जागे व्हा कोमजते आहे धरणी माय..दुष्काळी क्षेत्र पसरवते आहे आपलेच पाय..' ,' प्रदूषणावर तोडगा काय..वनसंपत्ती हाच उपाय..' हे वन संपत्ती जोपासा असा संदेश देणारे घोषवाक्ये व वन्यप्राणी व विविध पक्षांची माहिती देणारे फलक ब्रम्हगिरी पर्वत सर करणाऱ्या भाविक व पर्यटकांचे लक्ष वेधून घेत होते..निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवत तसेच वनसंपतीची जपवणूक करणारे फलक आनंदाने वाचत पुढची वाटचाल सुरु झाली..ब्रम्हगिरी ३.६ कि.मी. असा डाव्या बाजूला असलेला फलक नजरेस पडला आणि आता एवढं अंतर आपल्याला कापायचं आहे असा विचार करून थोडीशी विश्रांती घेत पुन्हा पुढे पाऊल टाकत निघालो..रस्ता हळू हळू उंच व्हायला लागल्याने आता मात्र ब्रम्हगीरीची चढाई सुरु झाली याचा अंदाज यायला लागला..आमच्या सारखे अनेक भाविक व पर्यटक ब्रम्हगिरी पर्वत सर करत होते त्यात काही कुटुंब तर काही विद्यार्थ्यांच्या सहली एन्जॉय करत निघाल्या होत्या..अधून मधून निसर्ग सौंदर्य खुलविणारे लहान धबधबे दिसायला लागले.मग काय कॅमेऱ्यात व मोबाईल मध्ये धबधब्याचे क्षण कैद केले आणि पुढे निघालो..दगडात कोरलेल्या उंच उंच पायऱ्यांना आता सुरुवात झाली होती..थोडंसं अजून पुढे चालत गेल्या नंतर 'मुक्ताई मंदीर' लागले त्यात दर्शन घेवून पुन्हा पुढे चालू लागलो.दगडात कोरलेलं हनुमान जी..तसेच अनेक देवदेवतांच्या मुर्त्या न्याहाळत पुढे सरकत होतो..याच दरम्यान अनेक छोटे छोटे व्यावसायिक निंबू शरबत, काकडी,चहा बिस्कीट आदींची दुकाने थाटून येणाऱ्या भाविकांना आस्वाद घेण्याचा आग्रह धरत होते..थोडंसं अजून पुुढे काही अंतर चालून गेल्यानंतर उंच अशा डोंगरातील दगडांमध्ये कोरलेल्या पायऱ्या सुरु झाल्या..अतिशय कमी अंतरात तयार केलेल्या या पायऱ्यांमध्ये भाविकांची गर्दी होऊ लागली..ब्रम्हगिरी सर करतांना आता मात्र थकवा जाणवू लागला..तोच पावसाच्या संततधार अशा शिडकाव्याला सुरुवात झाली..मनाला हवाहवासा वाटणाऱ्या शिडकाव्याने व भाविकांनी बम बम भोलेचा आसमंत गाजवणारा गजर केल्याने आलेला थकवा दूर पळून गेला..वानर राजाची स्वारी देखील याच ठिकाणी दाखल झाली..कुणी बिस्कीट तर कुणी चणे फुटाणे,शेंगदाणे या वानरांना देत पुढे निघालो..ज्यांनी काहीच दिले नाही त्यांच्या पिशव्या हिसकावून घेत इथे आपलीच दादागिरी चालत असल्याचा प्रत्यय या वानर राजांनी गुर गुर करत दिला..दगडातील कोरलेल्या पायऱ्या पूर्ण करीत पुढे निघाल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक टोळकं भेटलं.." भोले का प्रशाद है..एक कश मारलो..आगे जा के कठीणायी नहीं होंगी.." असे म्हणत 'जय भोले शंकर'चा नारा लावत जोरदार गांजाचा कश मारत धुराळा सोडला..थोडंसं पुढे चालून गेल्यानंतर ब्रम्हगिरीचा माथा दिसू लागला..उंच अशा माथ्यावर मंद असा वारा व धुक्यांनी चहू बाजूंनी व्यापलेला अथांग असा ब्रम्हगिरी पाहून मनाचे समाधान झाले..याच माथ्यावरून चहू बाजूंनी उंच उंच अशा डोंगररांगामध्ये संपूर्ण त्र्यंबकेश्वराचे मनोहारी वेढलेले रूप दिसू लागले..एकीकडे गोदावरी उगमस्थान व ब्रम्हगिरी मंदिर व दुसरीकडे भगवान शंकराने जटा आपटलेले स्थान असे दोन्ही मंदिरे दिसत असताना आम्ही मात्र गोदावरीच्या उगम स्थानाकडे जाण्याचा रस्ता धरला..निमुळता निसटता मार्ग असल्याने हळुवार पाय टाकत ब्रम्हगिरी मंदिराजवळ पोहोचलो..दर्शनासाठी मोठी गर्दी तिथे पाहायला मिळाली..गौतम ऋषीचे तपस्यास्थान असलेल्या ब्रम्हगिरी मंदिराचे मुख्य दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच असलेले मूळगंगा ( गोदावरीचे उगमस्थान ) बघितले..छोट्या छोट्या दगडातील कोरीव मुर्त्या शिवलिंग व त्यावर थाटलेले पूजेचे आकर्षक असेलेले बिल्वपत्र,रंगीबेरंगी फुले मनमोहुन टाकत होते..याच ठिकाणी स्थानिक पुरोहित उगम स्थानातील जल घेऊन मूर्तीवर अभिषेक करून देत होते..वानर राजांची स्वारी इथेही दिमतीला हजरच होती..राजगिरा लाडू त्यांना देत तिथून त्यांचा निरोप घेत भगवान शंकराने आपटलेल्या जटा मंदिराकडे आगेकूच केली..डोंगराच्या कडे कडेने चालत असतांना सखोल असलेल्या दरीचे दर्शन होते..ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मारत असलेल्या भाविकांचे विहंगम असे दृश्य या ठिकाणावरून मस्त दिसत होते..ते दृश्य कॅमेऱ्यात कैद करत पुढे निघालो..पुढील मार्गक्रमण करत असतांना डोंगरावर उगवलेली गवतांमधील छोटी छोटी सफेद रंगाची रानफुले खुणावत होती..तर मनातील सुप्त इच्छा पूर्ण व्हावी यासाठी छोटे छोटे दगड एकमेकांवर रचून मस्त अशी रास लावलेली बघायला मिळाली..ते बघून लहानपणी खेळत असलेल्या लंगूर ( लिंगोरच्या ) खेळाची आठवण झाली..तिथून पुढे निघाल्यानंतर भगवान शंकरांनी गोदावरी नदीचा प्रवाह बदलण्यासाठी जिथे जटा आपटल्या त्या शिवजटा मंदिरात जाऊन पोहोचलो..भगवान शंकराने टेकवलेले गुडघ्यांचे निशाण व डोक्यावरील आपटलेल्या जटा यांच्या खुणा यांचे दर्शन घेतले..हळू हळू आता पुन्हा परतीचा प्रवास सूरु झाला निसटता डोंगर असल्याने दगडांचा आधार घेत परतीच्या प्रवासाचे मार्गक्रमण सुरु झाले..पुढे जावून गंगा दरवाजाकडे देखील जायचे होते..पुन्हा एकदा गंंगा दरवाजाकडे जातांना दगडी पायऱ्या सुरु झाल्या थकवा तर खूप आला होता पण मनाची समजूत घालत अजून थोडंसं बाकी आहे असे म्हणत गंगा द्वार गाठले..फुलांचे हार विक्री करत असलेल्या माता भगिणींचा हार घेण्यासाठीचा आग्रह सुरु होता..तीन मुर्त्या आहेत १० रुपयात तीन हार घ्या..असा सूर त्यांनी लावला होता..गंगा द्वाराचे दर्शन घेवून डोंगराच्या कडेने थोडेसे पुढे वर चालल्या नंतर गोरक्ष गुफेचे दर्शन घेतले..आता खऱ्या अर्थाने परतीचा प्रवास सुरु झाला..पायऱ्या उतरत असतांना वाटेमध्ये पुन्हा श्रीराम कुंड व लक्ष्मण कुंडाचे दर्शन झाले..प्रभू रामचंद्र वनवासासाठी या स्थानावर आले असता आपल्या पितरांच्या श्राद्ध विधीसाठी औदूंबर वृक्षास बाण मारून गोदावरीचे पवित्र जल प्रवाहित केले होते.म्हणून या ठिकाणास राम तीर्थ म्हणून ओळखले जाते असा फलक या रामकुंडावर दर्शनी भागास लावलेला होता..रामकुंड व लक्ष्मण कुंड यांचे दर्शन घेवून मग आम्ही परतीचा प्रवास करत करत ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी उतरलो..खूप सुंदर आणि मनसोक्त अशी भटकंती करतांना परमेश्वराचे दर्शन झाल्याने मन समाधान झाले..पुनश्च एकदा आपल्या मित्रांसोबत ब्रम्हगिरीवर येऊन मनसोक्त अशी भटकंती करावी अशी इच्छा मनी बाळगून आमची ब्रम्हगिरी यात्रा संपवली..

- संदिप जेजुरकर,नांदगाव ( नाशिक )

6 comments:

  1. छान प्रवास वर्णन

    ReplyDelete
  2. संदिपजी आपली शब्दशैली अतिशय सहज आणी सोपी आहे, प्रवास वर्णन छान लिहलंय, वाचतांना ब्रम्हगिरी आठवते.... बम बम भोले.

    ReplyDelete
  3. मामा खुप छान वर्णन केलय तुम्ही झालेल्या प्रवासचे

    ReplyDelete