राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या...
नांदगाव : संदीप जेजुरकर
संपूर्ण शरीर हे व्याधींनी ग्रासलेले..उदरनिर्वाहाचे काहीही साधन नाही..सध्या दोन वेळची जेवणाची भ्रांंत..कुणी दिलं तर
खायचं..नाही भेटलं तर तसंच पडून राहायचं..रहायला हक्काचा निवारा नाही..आपल्या काडकीच्या झोपडीत कसंबसं पडून रहायचं..आणि आजचा दिवस उद्यावर ढकलायचा..एवढीच त्याची दिनचर्या..अठरा विश्वे दारिद्रय पाचीला पुजलेल्या रंगनाथ पवार यांना ' कुणी घर देतं का घर ' अशी म्हणण्याची वेळ आलेली असतांनाच सामाजिक कार्य करणाऱ्या युवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने त्यास मदतीचा हात दिला.. रविवार सुटीचा दिवस असतांना कुठेतरी मौज मजा एन्जॉय करण्यात दिवस घालवायचा हे आजच्या तरुणाईचं ब्रीद ठरलेलं असतांना ' युवा फाउंडेशन ' या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मात्र त्यास फाटा देत ' एक हात मदतीचा ' हि संकल्पना राबवत श्रमदान करून श्री.पवार यांच्या झोपडीची दुरुस्ती केली..झोपडीची सुस्थितीतील दुरुस्ती बघून रंगनाथ पवार यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या..आपले थरथरते हात उंचावून त्याने या युवकांना आशीर्वाद देत ' तुमचं कल्याण होईल ' असा आशीर्वाद दिला..कैलास नगर जवळील एका वस्तीवर शारीरिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या रंगनाथ पवार हे एका दयनीय अवस्थेतील आपल्या झोपडीत कसेबसे दिवस काढत असत.पावसाळा सुरू झाला की हे गृहस्थ रात्र रात्र जागून काढत होते.उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूत चोहो-बाजूने उघडीच असलेली हि झोपडी शेवटच्या घटका मोजत होती. दिवाळीचे फरसाण व कपडे वाटप करण्यासाठी गेलेल्या युवा फाउंडेशनच्या नजरेत हि झोपडी खटकली होती..आणि आज या सामाजिक संस्थेने पुढाकार घेत या झोपडीची दुर्दशा दूर करण्याचे ठरवले आणि आपल्या सवंगड्यांसह झोपडी दुरुस्ती करत रविवारची सुट्टी खऱ्या अर्थाने सत्कारणी लावली..या झोपडीच्या चारही बाजू बंद करीत एक नवी कोरी ताडपत्री त्यावर अंथरूण कायमचा भक्कम असा निवारा श्री.पवार यांना करून दिला..या श्रमदानात छत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम सर यांचे मोठे योगदान लाभले तर झोपडी दुरुस्तीसाठी युवा फाउंडेशनचे प्रसाद वडनेरे, सुमित सोनवणे, रूषी जाधव, विकास शर्मा, धनराज शिदें, गौरव रूणवाल, सद्दाम शेख, मुज्जु शेख, मयुर लोहाडे, राहिल सैय्यद, गणेश सांगळे, तौसिफ शेख, साद शेख, सचिन धामणे, राहुल ठोके आदींनी मदत केली..
No comments:
Post a Comment