Friday, 20 December 2019

माणसाने आयुष्य जगायचं तरी कसं..!

माणसाने_आयुष्य_जगायचं_तरी_कसं..!
           
               रोजची_तीच_नित्याचीच_धावपळ..दोन पैसे कमवायचे.. आणि उदरनिर्वाह साधायचा..हा सगळा खेळ साधतांना माणूस आपलं जगणं विसरत चालला आहे..माणसाचं आयुष्य खूप छोटे आहे..धकाधकीच्या या जीवनात माणसाला समाधानाने जगता आलं पाहिजे..अशी भावना प्रत्येकाने जपावी असं मला वाटतं.. दिवसाची सुरुवात झाल्यानंतर..कामाची लगबग.. त्यातच आजच्या दिवसभरातील कामे काय करायची ती यादी डोळ्यापुढे येते.. कामाला सुरुवातही होते..पण काय होतं ना त्यातल्या पहिल्या दुसऱ्या कामालाच अडथळे यायला सुरुवात होते आणि पूर्ण दिवसाचं शेड्युल अक्षरशः चुकून जातं.. पहिल्या कामाचा पाठपुरावा करतांनाच चीड चीड सुरू होते.त्यातही आपल्या मनासारखे काम होत नाही.यामुळे काय होते तर पूर्ण दिवसाचीच पुरती वाट लागून जाते.मला जे हवंय जे घडायला पाहिजे होते तसं न घडल्याने मग कंटाळा यायला लागतो..हताश झालेले मन मग कुठंतरी विरंगुळा शोधायला लागतो..पण काय असतं ना हा विरंगुळा शोधल्यानंतरही माणसाच्या मनात मात्र तीच कामाची कालवा कालव सुरू असते..पुन्हा कामात मन रमवाव लागतं..हे सगळं असंच चालत राहिलं तर माणसाला ताण तणावाला सामोरं जावं लागत.. नको त्या माणसाशी मग भांडण होतात..मग आपण ज्याला आपण आपलं मानलेलं असतं,गृहीत धरलेलं अशा माणसाकडे हक्काने जातो आणि त्याच्या पुढ्यात आपल्या समस्या मांडतो व त्याच्याकडून मदत मिळेल अशी अपेक्षा बाळगतो पण होत उलटंच ज्या कामासाठी आपण त्या व्यक्तीकडे गेलेलो असतो तोच व्यक्ती आपल्या कामाला विरोध दर्शवत असतो..किंबहुना ते कामच करत नाही..मग तिथे आपला भ्रमनिरास होतो..त्यावेळेला मात्र आपल्याला खूप काही आठवायला लागतं.. जी व्यक्ती अथवा संस्थेला आपण यापूर्वी छोटीशी का होईना मदत केलेली असते किंवा आपल्या माध्यमातून ती झालेली असते.अशी थोडी तरी जाणीव त्या व्यक्तीने ठेवायला हवी होती असं वाटायला लागून मन आणखी दुःखी होत..दिवसभरात आलेले हे अनुभव सोबत घेऊन माणूस मग हताश होऊन आपल्या घराकडे वळतो.त्याला वाटतं की आता आपण आपल्या कुटुंबियांसमवेत रमलो म्हणजे दिवसभरात आलेले वाईट अनुभव बाजूला सारून कुटुंबियांत रमण्याचा प्रयत्न करू पण तेथेही त्याचं दुर्दैव्य आडवं येत..आज दिवसभरात आपल्या समोर आलेल्या अडचणी कुटुंबियांना सांगण्याच्या आतच कुटुंबियांच्या असलेल्या अपेक्षा व अडचणी पुढ्यात येतात..की ज्याचं उत्तर याच्याकडे नसतं..पुन्हा कुटुंबियांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागतं.. हे असलं आयुष्य परमेश्वराने माणसाला दिलं आहे..असो या विषयाच्या शेवटी मी एवढंच म्हणेल की, क्षणभर सुखाचा शोध घेण्यासाठी व चांगले आयुष्य जगण्यासाठी निघालेल्या माणसाच्या पदरी मात्र नेहमी निराशा व दुःखाचाच डोंगर उभा ठाकलेला असतो मग माणसाने आयुष्य जगायचं तरी कसं..?

- संदीप जेजुरकर, नांदगांव ( नाशिक )
  - 9423151089

Thursday, 7 November 2019

अहो...' सरकार ' कधी स्थापन करणार ?

अहो...' सरकार ' कधी स्थापन करणार..?

           विधानसभेच्या निवडणुका झाल्या..या निवडणुकीत भाजप -  शिवसेना व मित्रपक्षांकडे महाराष्ट्रातील तमाम जनतेने कौल दिला..विजयी जल्लोषही करण्यात आला..पत्रकार परिषद  घेऊन जनतेचे आभार मानण्यात आले..लवकरच महायुतीचं सरकार या राज्यात स्थापन होईल असं वाटतं असतांना मात्र आज १५ दिवस उलटून गेले , विधानसभेची मुदतही आज संपणार असतांना या राज्यात सरकार मात्र स्थापन झालेलं नाही..कारण काय तर लोकसभा निवडणुकीच्या आधी मित्रपक्षांच्या जागा ठरवून उरलेल्या जागेत भाजप आणि शिवसेना यांनी फिफ्टी - फिफ्टी जागा लढवायच्या..सत्ता आली तर सत्तेतील पदांमध्ये समसमान वाटप करायचे असा फॉर्म्युला ठरला होता..असे शिवसेनेकडून सांगत सरकार स्थापनेसाठी आपला प्रस्ताव भाजप पुढे शिवसेनेने ठेवला..मात्र शिवसेनेला गृहीत धरलेल्या भाजप कडून या बद्दल काहीच रिप्लाय आला नाही.उलट मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं काहीच ठरलेलं नव्हतं ' असं एका अनौपचारिक गप्पांमध्ये जाहीर केलं..त्यामुळे झालं काय तर शिवसेनेचा स्वाभिमान ' इगो ' दुखावला गेला..आणि शिवसेनेकडून मग सामनाचे संपादक खासदार संजय राऊत पुढे आले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री पदाची मागणी करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचेसोर जे ठरलं त्यावर भाजपाने बोलावं असं ठणकावून सांगितलं..त्यानंतर श्री.राऊत यांनी जशी संधी मिळेल तस मित्रपक्ष भाजपाला चांगलेच धारेवर धरले..या दरम्यान, भाजपाची मात्र चांगलीच गोची झाली..भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आदींनी शिवसेनेचे चिमटे काढत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देवून सरकार महायुतीचंच येणार हे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला..नुसता ठरला नव्हे तर तो संजय राऊत यांनी हाणून पाडला..राज्याच्या राजकारणात एकीकडे बलाढ्य असलेली भाजपा  या संजय राऊतांपुढे मात्र हतबल झाली..नुसती हतबल झाली नाही तर सपशेल लोटांगण घालायला पण आता तयार आहे..जनतेच्या मते मागील पाच वर्षांपासून सुरु असलेली शिवसेनेचे झालेली फरफट व त्याचा बदला अवघ्या पंधरा दिवसाच्या काळातच संजय राऊत यांनी घेतला असं बोलल्या जात आहे..गगनाला हात लावणाऱ्या भाजपाला पुन्हा एकदा जमिनीवर आणण्याचे काम संजय राऊत यांनी केलं..कायमच शिवसेनेला या ना त्या कारणावरून ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांनीही भाजपाला ट्रोल करीत शिवसेनेच्या बाजूने मत मांडण्यास सुरुवात केली आणि शिवसेनेने दाखविलेल्या भूमिकेबद्दल कौतुक केले..आता सध्या काय सुरु आहे तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व किंगमेकर च्या भूमिकेत असलेले मा.शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे..राजकारणाला कलाटणी देणारं व्यक्तिमत्व आणि काहीतरी धक्कादायकच निर्णय घेवून आपले बुद्धीचातुर्य अबाधित ठेवत राजकारणात आपणच ' पावरफुल ' असल्याचे दाखवून देणारे श्री.पवार हे याप्रसंगी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे..असो
मी तर एवढंच म्हणेल राज्यातील शेतकरी जो यापूर्वी कोरड्या दुष्काळाने होरपळला होता तो यंदा मात्र ओल्या दुष्काळाने होरपळलेला आहे त्या शेतकरी राजाला लवकरात लवकर मदत व्हावी यासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी लवकर सरकार स्थापन व्हावं हीच तमाम महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे..

या सगळ्या घडामोडीत मला असं वाटतं की,...

• भाजपने जर बहुमताचा दावा केला तर ते बहुमत सिद्ध करू शकणार नाही..मात्र शिवसेनेने बहुमताचा दावा केला तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्याने शिवसेना बहुमत सिद्ध करेल..

• जर भाजप - शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्यात भाजपाच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद दिलं तर त्या पदावर देवेंद्र फडणवीस नसतील...

• अडीच - अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं तर त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री हा पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळेल..

• चार महत्वाच्या खात्यांपैकी दोन खाते शिवसेनेकडे असतील..

• शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून राज्यात सरकार स्थापन होऊ शकत त्याला काँग्रेस बाहेरून पाठींबा देईल..

• सत्तेपासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी वेळेप्रसंगी राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री म्हणून मा.शरद पवार देखील बसू शकतात त्यास शिवसेना अटी शर्ती ठेवून पाठींबा देईल..

• राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही..असंही मला वाटतं

ता.क. - राज्यातील घडामोडींवर लिहिण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने आपल्या प्रतिक्रिया व सूचना अपेक्षित आहे..

- संदीप जेजुरकर,नांदगाव ( नाशिक )
   - ९४२३१५१०८९

Sunday, 8 September 2019

भटकंती - अंकाई किल्ला

 भटकंती - अंकाई किल्ला...
मनमाड पासून १४ कि.मी.दूर येवला तालुका हद्दीत..

पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते भटकंतीचे..आणि भटकंती साठी योग्य ठिकाण म्हणजे गड,किल्ले व डोंगररांगा.. मागील आठवड्यात पहिला पाऊस झाला आणि आज मग अंकाई किल्ल्यावर जायचं ठरलं..सकाळी सहा वाजेपासून मग मित्रांना नेहमीप्रमाणे कॉल सुरु झाले..प्रा.शिवाजी पाटील, वनरक्षक सुनील खंदारे व लहान बंधू निखिल याने अंकाई किल्ल्यावर भटकंतीसाठी जायला होकार दर्शविला..दोन दुचाकी सोबत घेऊन सकाळी ६ : ३० वाजता नांदगाव वरून स्वारी मनमाड पासून १४ कि.मी.अंतर दूर असलेल्या अंकाई किल्ल्याच्या दिशेने निघाली.. रस्त्यात पावसाचा थोडा शिडकावा झाला..नंतर मात्र पाऊस थांबला..बरोबर ४५ ते ५० मिनिटांनी मग आम्ही अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो..दुचाकी पार्क केली आणि किल्ल्याकडे बघितले.. त्याचवेळी आमचे मार्गदर्शक प्रवीण व्यवहारे सरांना कॉल केला आणि विचारले सर कुठं आहे ? तेव्हा सर डॉ.भागवत दराडे व तुषार गोयल यांच्यासमवेत अंकाई किल्ल्यावर पोहोचलेले सुद्धा होते..म्हटलं चला आता आपल्याला निघावं लागेल नेहमीप्रमाणे थोडंसं टेन्शन आलं..हल्ली फिरणं जरा कमी झाल्याने शरीर देखील सुस्त झालेलं..पण एकदा ठरलं की मग जायचंच हा ईरादा पक्का असल्याने स्वारी निघाली...वनरक्षक खंदारे आमच्या चौघांमधील ' फिट ' माणूस..आपल्या घड्याळातील Stopwatch लावून सुसाट सुटला..आणि डायरेक्ट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ ' आठ ' मिनिटात जाऊन पोहोचला सुद्धा आणि तेथून आम्हाला हात वर करत या लवकर असा आवाज पण दिला..तोपर्यंत आम्ही रस्ताच decide करत होतो..की कोणत्या रस्त्याने जायचं..! रस्ता मिळाला आणि आम्ही मजल दरमजल करत निघालो..आमचा चालण्याचा speed मात्र हळूच होता..तरीही थोडंसं थकल्यासारखं जाणवलं की आम्ही थांबून घेत होतो..असं करत करत किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आम्ही पोहोचलो.. थोडीशी थट्टा मस्करी करत मग आमचं फोटो सेशन सुरु झालं..किल्ल्यावर पोहोचल्यानंतर सुरुवातीलाच किल्ल्याची पडझड झालेली वास्तू बघितली की मनाला वाईट वाटायचं आज मात्र सुखद धक्काच बसला..पडझड झालेल्या किल्ल्याची डागडुजी करतांना अगदी त्याच धाटणीच्या त्याच दगडांनी भिंतीचे आणि किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांचे काम सुरु होते..खूप चांगल्या प्रतीचे काम बघून मनाला समाधान वाटले..पुन्हा किल्ल्यावर चढाई सुरु झाली..अंकाई किल्ल्याच्या मध्यावर गेल्यानंतर तेथून टंकाई किल्ला व हडबीची शेंडी व स्वतःचे हि फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले..आणि पुढचा प्रवास सुरु झाला..वाटेत प्रवीण व्यवहारे सर , डॉ.भागवत दराडे व तुषार गोयल यांची भेट झाली..थोड्याशा गप्पा मारत दोन सेल्फीही खेचले..आता किल्ल्याच्या पायऱ्या संपल्या होत्या.किल्ल्यावरील दगडात कोरलेले पाण्याचे टाके व कोरीव काम बघितले..किल्ल्यावरील अगस्ती ऋषी आश्रम व तेथील मंदिरात दर्शन घेत पुन्हा पुढे चालू लागलो पाण्याचे तळे व छोटी छोटी दोन मंदिरे बघितले..आमच्या सारखे अनेक पर्यटक आज रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी किल्ल्यावर भटकंती करत होते..पुढे गेल्यानंतर मग डोंगरावर पांघरलेली मनमोहक हिरवळ लक्ष वेधू लागली..किल्ल्यावर चढतांनाचा थकवा या हिरवळीने आमच्याकडून हिरावून नेला..मस्त रमत - गमत पुढे चालतच होतो.किल्ल्याच्या शेवटच्या भागापर्यंत आम्ही पोहोचलो..तिथे ' मोठे बाबा ' या दर्ग्याच दर्शन घेतलं..तेथूनच मनमाड - येवला रस्त्यावरील विहंगम असे दृश्य नजरेत व कॅमेऱ्यात कैद केले..तर दुसऱ्या बाजूला हडबीची शेंडी ( thums up ) पण इकडे या अशी खुणावत होती..किल्ल्याचा शेवटचा टप्पा असल्याने थोडेसे ' दबंग व स्टायलिश ' फोटोसेशन तेथे केलं.वनरक्षक सुनील खंदारे , प्रा.शिवाजी पाटील व मी भिंतीवरून उड्या मारण्याचा आनंद ही याच ठिकाणी लुटला..हे सगळं टिपण्याचं काम निखिल करतच होता..मग घड्याळाकडे बघितलं आणि वेळ झाला म्हणून परतीच्या प्रवासाला लागलो..हळु हळू करत किल्ल्यावरून खाली उतरू लागलो..किल्ला उतरतांना पायाला मात्र थोडं जाणवायला लागलं..पाय उचलतांना थोडी कसरत करावी लागत होती.त्यातच पाऊस झालेला असल्याने ओलाव्यामुळे पायऱ्या निसरड्या होवून सरकण्याचे चान्सेस जरा जास्तच होते..पण तोल सावरत हळू हळू मार्गक्रमण सुरु झालं..आणि पायथ्याला पोहोचत किल्ल्याचा प्रवास थांबवला..आपल्या दुचाकीला किक मारत किल्ल्याची सफर छान झाली असे म्हणत मनमाड गाठले..मनमाड बस स्थानकाजवळील ' श्री.दत्त टी स्टॉल ' वर मस्त वाफाळलेला चहा मारला आणि मग नांदगावकडे प्रयाण केले..
- संदीप जेजुरकर, नांदगाव ( नाशिक ) 
  भ्रमणध्वनी - ९४२३१५१०८९

ए मेरे वतन के लोगो...जरा आँख में भरलो पाणी...

नांदगाव : अमर रहे , अमर रहे...वीर जवान अमर रहे..भारत माता की जय..
           अमर रहे , अमर रहे...वीर जवान अमर रहे..भारत माता की जय..आदी घोषणा देत आज क-ही ( ता.नांदगाव ) येथील शहीद जवान मल्हरी खंडेराव लहिरे ( वय - २७ ) यास लष्करी जवानांच्या उपस्थितीत  शासकीय इतमामात ' बौद्ध पद्धतीने ' अखेरचा निरोप देण्यात आला.
           
जामनगर  ( गुजरात ) मधील एडीआरटीच्या युनिटमध्ये शस्त्रगाराची सुरक्षा करीत असतांना मल्हरी याचे अंगावर विज पडुन तो शहीद झाला होता..याप्रसंगी गहिवरलेल्या अवस्थेत ' माझा राजा मला सोडुन  का गेला..' अशी आर्त हाक देत  मल्हरीची पत्नी ' शीतल ' च्या अश्रूंचा बांध आज फुटला होता..बापानं काबाड कष्ट करत माझ्या लेकराला सैन्यात नोकरीला लावलं..आता कुठं आम्हाला सुगीचे दिवस आले होते त्यात माझा मल्हरी मला सोडून गेला..असे सांगत मल्हरीची आई ' सुशिलाबाई ' धाय मोकलून रडत - रडत आपल्या मुलाच्या आठवणी सांगत होती..तर चार वर्षाचा चिमूरडा ' सार्थक ' हातात तिरंगी ध्वज घेऊन अभिमानाने मिरवत होता...नेमकं काय सुरु आहे हेच त्याला कळत नव्हतं..मल्हरीचा ' बाप ' तर निःशब्द झाला होता..पोटच्या गोळ्याला आपल्याच डोळ्या देखत अग्निडाग त्यांना द्यायचा होता..हे सगळे गहिवरलेले प्रसंग बघून उपस्थित्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या..मनमाड जवळील क-ही ( ता.नांदगाव ) या गावात राहणाऱ्या खंडेराव लहिरे मुलगा मल्हारी हा २०१२ यावर्षी सैन्यात भरती झाला होता. गुजरात मधील जामनगर येथे तो कार्यरत होता. एडीआरटीच्या युनिटमध्ये शस्त्रगाराची सुरक्षेची जबाबदारी त्याच्यावर होती. एका उंच ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असताना  शुक्रवारी ( दि.६ ) त्याचे अंगावर वीज पडल्यानं त्याचा अपघाती मृत्यू झाला होता.चार वर्षांपूर्वीच त्याचा विवाह शीतल सोबत झाला होता. सार्थक हा चार वर्षाचा मुलगा त्यांना आहे..काल ( दि.७ ) मध्यरात्री त्याचे पार्थिव मनमाड शहरातील पोलीस स्थानकात दाखल होऊन आज सकाळी ८ वाजता मूळगावी क-ही येथे मिलिटरीच्या खास वाहनाने आणण्यात आले..कुटुंबियांची भेट घडविल्यानंतर सजविलेल्या रथातून अमर रहे अमर रहे..वीर जवान अमर रहे..भारत माता की जय..आदी घोषणा देत पोलिसांचा ताफा, पार्थिवाच्या दोन्ही बाजूला मानवी साखळी अशा लवाजम्यासह भावपूर्ण वातावरणात त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली..यावेळी उपस्थित असलेल्या आर्मी सुभेदार डी.एल.राख, हवालदार बाळू घुगे, ज्ञानेश्वर आव्हाड आदींसह खासदार भारती पवार, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ सभापती मनीषा पवार, रत्नाकर पवार, पंचायत समितीच्या सभापती विद्या पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार मनोज देशमुख, गटविकास अधिकारी खताळे, मनमाड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी समरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दशरथ लहिरे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, पंकज खताळ, माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, बबलू पाटील, सरपंच ज्योती लहिरे, माजी सैनिक नानासाहेब काकळीज आदींनी पुष्पचक्र अर्पण केले..आपल्या मुलाची आठवण आणि त्याच्या आहुतीचे प्रतीक म्हणून पार्थिवावर लपेटलेला राष्ट्रध्वज (तिरंगा ध्वज) परिवाराच्या स्वाधीन करण्यात आला.चार वर्षाच्या सार्थक ने आपल्या पित्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला..यावेळी १९०७ लाईट रेजिमेंट ,देवळाली कॅम्प ( नाशिक ) च्या नायब सुभेदार योगेंद्र सिंह, हवालदार बाचकार सिंह, वीर नामदेव, नायक अश्विनकुमार, लान्सनायक इंद्रजीत सिंग, अजयकुमार, नटराजन, विवेकानंद, राकेशकुमार, राहुलचंद्रा, दिपककुमार आदी जवानांच्या युनिटसह मनमाड पोलिसांनी सलामी देत तीन राऊंड फायर करत आपल्या सहकाऱ्याला श्रद्धांजली वाहिली..अंत्ययात्रेस राजकीय पदाधिकारी , विविध खात्याचे शासकीय अधिकारी, माजी सैनिक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आदींसह पंचक्रोशीतील हजारोच्या संख्येने ग्रामस्थ,आप्तेष्ट व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

- संदीप जेजुरकर, नांदगाव 
   नाशिक -
 - ९४२३१५१०८९

Thursday, 6 June 2019

नांदगाव तालुक्याचे आरोग्य सांभाळणारा एक ' देवदूत '

         आपल्या रुग्णसेवेतून ज्यांनी अल्पावधीत आपल्या कार्याचा ठसा उमटवला व ज्यांना तालुक्यातील जनतेने ' दैवत्व ' बहाल केले असे डॉ.रोहण निंबाजी बोरसे..नांदगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट करत एक नव्हे दोन नव्हे तर ग्रामीण रुग्णालयाला व स्वकर्तृत्वामुळे डॉ.आनंदीबाई जोशी, कायाकल्प असे अनेक पुरस्कार ज्यांनी मिळवले आजही विविध संस्थाद्वारे त्यांना नेहमीच गौरविण्यात येते असे आमचे मोठे बंधू तथा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे..ग्रामीण रुग्णालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री.बोरसे यांनी रुग्णालयाचा कायापालट सुरु केला..जिथे ४५ ते ५० बाह्यरुग्ण तपासले जायचे तिथे आज मात्र ३०० हुन अधिक बाह्यरुग्ण तपासले जातात..सर्पदंश, अपघात , साथीचे आजार आदी रुग्णांची येथे मोठी संख्या असते.पण डॉ.बोरसे आणि त्यांची संपूर्ण टीम अगदी निस्वार्थ भावनेने आपली रुग्ण सेवा बजावत असतांना रुग्णाबरोबर एक भावनिक नातेही जोडत असते..ग्रामीण रुग्णालय, नांदगावची एक वेेगळी ओळख तयार झाली आहे.गरोदर महिलांची प्रसूती कशी ही असो अगदी सहजरीत्या ती रुग्णालयात प्रसूत होणारच.. हा या रुग्णालयाचा विशेष हातखंडा..मागील एक वर्षात तब्बल १ हजाराहून अधिक महिला प्रसूत होण्याचा आकडा पार केला गेला..कोकणातील सर्पदंशावरील उपचारात प्रसिद्ध असलेले डॉ. बावस्कर यांच्या पुस्तकांचे वाचन करून प्रेरित झालेल्या डॉ.रोहन बोरसे यांनी आजतागायत अनेक सर्पदंश झालेल्या रुग्णांचे प्राण वाचविलेले आहे..प्रसंगी आजही ते डॉ.बावस्कर यांच्याशी दूरध्वनी वरून संवाद साधत सर्पदंशावरील अधिक उपचाराविषयी माहित घेत असतात..ग्रामीण रुग्णालयात आरोग्य अधिक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ.रोहण बोरसे हे नुसतीच नोकरी न करता त्यातुन मोठ्या प्रमाणात समाज सेवा देखील करतात..स्मितभाषी व नम्रता अंगिकारलेल्या डॉ.बोरसे हे तालुक्यात आपल्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर ' किर्तीवंत ' झाले आहे..साकोरा ( ता. नांदगाव ) येथील मूळचे रहिवासी असलेले डॉ.रोहन बोरसे यांचे कुटुंबीय सध्या नोकरी निमित्ताने मुंबईत स्थायिक आहेत..पण वडील निंबाजी बोरसे यांचा खास आग्रह असल्याने व जन्मभूमी असलेल्या नांदगावं तालुक्यात जर सेवा बजावता येईल तर विशेष असा आनंद होईल अशी वडीलांची इच्छा होती..त्यानुसार २०११ या वर्षी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षकपदावर त्यांची नियुक्ती झाली..आणि वडिलांच्या इच्छेनुसार आपल्या सेवेच्या माध्यमातून त्यांनी या संधीचे सोने केले..विविध समस्यांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालय हे ग्रासलेले होते.जेव्हा डॉ.रोहण बोरसे यांनी या रुग्णालयाची सूत्रे हातात घेतली तेव्हापासून ते आजतागायत त्यांनी रुग्णालयाचा चेहरा -मोहराच बदलवत एक वेगळी ओळख निर्माण केली..गरुजू रुग्णांना आपल्या खिशातील पैसे देवून पुढील उपचारासाठी मदत देखील केल्याचे अनेक उदाहरणे त्यांचे आहेत.समाजाप्रती असलेले त्यांचे प्रेम या माध्यमातून दिसून येते..अगदी मोजक्या संख्येने ग्रामीण रुग्णालयाची उपचारासाठी वाट धरणारे आज शेकडोच्या संख्येने दाखल होतात..अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने देखील हे रुग्णालय आता सुसज्ज होत आहे..ग्रामीण रुग्णालयातील माझे सर्व कर्मचारी निष्ठेने काम करतात.त्या कामाच्या प्रति निष्ठा असल्याने यश आपोआपच मिळत असते.माझ्या वडिलांनी दिलेला मोलाचा सल्ला आत्मसात करून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून काम सुरु केले.समस्त नांदगावकरांच्या सहकार्यामुळेच विविध पुरस्कारांपर्यंत मजल मारता आल्याचे श्री.बोरसे सांगत आपल्या मनाचा मोठेपणा दाखवतात..डॉ.रोहण बोरसे यांच्याविषयी शेवटी एकच म्हणावं लागत की नांदगाव तालुक्याचं आरोग्य जोपासणारा एक देवदूतच आमच्या तालुक्याला लाभला आहे..ज्या देवाने मलाही एकदा ' जीवदान ' दिलं आहे..

- संदीप जेजुरकर

  सदस्य - रुग्ण कल्याण समिती
  ग्रामीण रुग्णालय,नांदगाव ( नाशिक ) 

- ९४२३१५१०८९