नांदगाव : अमर रहे , अमर रहे...वीर जवान अमर रहे..भारत माता की जय..
अमर रहे , अमर रहे...वीर जवान अमर रहे..भारत माता की जय..आदी घोषणा देत आज क-ही ( ता.नांदगाव ) येथील शहीद जवान मल्हरी खंडेराव लहिरे ( वय - २७ ) यास लष्करी जवानांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात ' बौद्ध पद्धतीने ' अखेरचा निरोप देण्यात आला.
जामनगर ( गुजरात ) मधील एडीआरटीच्या युनिटमध्ये शस्त्रगाराची सुरक्षा करीत असतांना मल्हरी याचे अंगावर विज पडुन तो शहीद झाला होता..याप्रसंगी गहिवरलेल्या अवस्थेत ' माझा राजा मला सोडुन का गेला..' अशी आर्त हाक देत मल्हरीची पत्नी ' शीतल ' च्या अश्रूंचा बांध आज फुटला होता..बापानं काबाड कष्ट करत माझ्या लेकराला सैन्यात नोकरीला लावलं..आता कुठं आम्हाला सुगीचे दिवस आले होते त्यात माझा मल्हरी मला सोडून गेला..असे सांगत मल्हरीची आई ' सुशिलाबाई ' धाय मोकलून रडत - रडत आपल्या मुलाच्या आठवणी सांगत होती..तर चार वर्षाचा चिमूरडा ' सार्थक ' हातात तिरंगी ध्वज घेऊन अभिमानाने मिरवत होता...नेमकं काय सुरु आहे हेच त्याला कळत नव्हतं..मल्हरीचा ' बाप ' तर निःशब्द झाला होता..पोटच्या गोळ्याला आपल्याच डोळ्या देखत अग्निडाग त्यांना द्यायचा होता..हे सगळे गहिवरलेले प्रसंग बघून उपस्थित्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या..मनमाड जवळील क-ही ( ता.नांदगाव ) या गावात राहणाऱ्या खंडेराव लहिरे मुलगा मल्हारी हा २०१२ यावर्षी सैन्यात भरती झाला होता. गुजरात मधील जामनगर येथे तो कार्यरत होता. एडीआरटीच्या युनिटमध्ये शस्त्रगाराची सुरक्षेची जबाबदारी त्याच्यावर होती. एका उंच ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असताना शुक्रवारी ( दि.६ ) त्याचे अंगावर वीज पडल्यानं त्याचा अपघाती मृत्यू झाला होता.चार वर्षांपूर्वीच त्याचा विवाह शीतल सोबत झाला होता. सार्थक हा चार वर्षाचा मुलगा त्यांना आहे..काल ( दि.७ ) मध्यरात्री त्याचे पार्थिव मनमाड शहरातील पोलीस स्थानकात दाखल होऊन आज सकाळी ८ वाजता मूळगावी क-ही येथे मिलिटरीच्या खास वाहनाने आणण्यात आले..कुटुंबियांची भेट घडविल्यानंतर सजविलेल्या रथातून अमर रहे अमर रहे..वीर जवान अमर रहे..भारत माता की जय..आदी घोषणा देत पोलिसांचा ताफा, पार्थिवाच्या दोन्ही बाजूला मानवी साखळी अशा लवाजम्यासह भावपूर्ण वातावरणात त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली..यावेळी उपस्थित असलेल्या आर्मी सुभेदार डी.एल.राख, हवालदार बाळू घुगे, ज्ञानेश्वर आव्हाड आदींसह खासदार भारती पवार, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ सभापती मनीषा पवार, रत्नाकर पवार, पंचायत समितीच्या सभापती विद्या पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार मनोज देशमुख, गटविकास अधिकारी खताळे, मनमाड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी समरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दशरथ लहिरे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, पंकज खताळ, माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, बबलू पाटील, सरपंच ज्योती लहिरे, माजी सैनिक नानासाहेब काकळीज आदींनी पुष्पचक्र अर्पण केले..आपल्या मुलाची आठवण आणि त्याच्या आहुतीचे प्रतीक म्हणून पार्थिवावर लपेटलेला राष्ट्रध्वज (तिरंगा ध्वज) परिवाराच्या स्वाधीन करण्यात आला.चार वर्षाच्या सार्थक ने आपल्या पित्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला..यावेळी १९०७ लाईट रेजिमेंट ,देवळाली कॅम्प ( नाशिक ) च्या नायब सुभेदार योगेंद्र सिंह, हवालदार बाचकार सिंह, वीर नामदेव, नायक अश्विनकुमार, लान्सनायक इंद्रजीत सिंग, अजयकुमार, नटराजन, विवेकानंद, राकेशकुमार, राहुलचंद्रा, दिपककुमार आदी जवानांच्या युनिटसह मनमाड पोलिसांनी सलामी देत तीन राऊंड फायर करत आपल्या सहकाऱ्याला श्रद्धांजली वाहिली..अंत्ययात्रेस राजकीय पदाधिकारी , विविध खात्याचे शासकीय अधिकारी, माजी सैनिक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आदींसह पंचक्रोशीतील हजारोच्या संख्येने ग्रामस्थ,आप्तेष्ट व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- संदीप जेजुरकर, नांदगाव
नाशिक -
- ९४२३१५१०८९
No comments:
Post a Comment