Thursday, 6 June 2019

नांदगाव तालुक्याचे आरोग्य सांभाळणारा एक ' देवदूत '

         आपल्या रुग्णसेवेतून ज्यांनी अल्पावधीत आपल्या कार्याचा ठसा उमटवला व ज्यांना तालुक्यातील जनतेने ' दैवत्व ' बहाल केले असे डॉ.रोहण निंबाजी बोरसे..नांदगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट करत एक नव्हे दोन नव्हे तर ग्रामीण रुग्णालयाला व स्वकर्तृत्वामुळे डॉ.आनंदीबाई जोशी, कायाकल्प असे अनेक पुरस्कार ज्यांनी मिळवले आजही विविध संस्थाद्वारे त्यांना नेहमीच गौरविण्यात येते असे आमचे मोठे बंधू तथा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे..ग्रामीण रुग्णालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री.बोरसे यांनी रुग्णालयाचा कायापालट सुरु केला..जिथे ४५ ते ५० बाह्यरुग्ण तपासले जायचे तिथे आज मात्र ३०० हुन अधिक बाह्यरुग्ण तपासले जातात..सर्पदंश, अपघात , साथीचे आजार आदी रुग्णांची येथे मोठी संख्या असते.पण डॉ.बोरसे आणि त्यांची संपूर्ण टीम अगदी निस्वार्थ भावनेने आपली रुग्ण सेवा बजावत असतांना रुग्णाबरोबर एक भावनिक नातेही जोडत असते..ग्रामीण रुग्णालय, नांदगावची एक वेेगळी ओळख तयार झाली आहे.गरोदर महिलांची प्रसूती कशी ही असो अगदी सहजरीत्या ती रुग्णालयात प्रसूत होणारच.. हा या रुग्णालयाचा विशेष हातखंडा..मागील एक वर्षात तब्बल १ हजाराहून अधिक महिला प्रसूत होण्याचा आकडा पार केला गेला..कोकणातील सर्पदंशावरील उपचारात प्रसिद्ध असलेले डॉ. बावस्कर यांच्या पुस्तकांचे वाचन करून प्रेरित झालेल्या डॉ.रोहन बोरसे यांनी आजतागायत अनेक सर्पदंश झालेल्या रुग्णांचे प्राण वाचविलेले आहे..प्रसंगी आजही ते डॉ.बावस्कर यांच्याशी दूरध्वनी वरून संवाद साधत सर्पदंशावरील अधिक उपचाराविषयी माहित घेत असतात..ग्रामीण रुग्णालयात आरोग्य अधिक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ.रोहण बोरसे हे नुसतीच नोकरी न करता त्यातुन मोठ्या प्रमाणात समाज सेवा देखील करतात..स्मितभाषी व नम्रता अंगिकारलेल्या डॉ.बोरसे हे तालुक्यात आपल्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर ' किर्तीवंत ' झाले आहे..साकोरा ( ता. नांदगाव ) येथील मूळचे रहिवासी असलेले डॉ.रोहन बोरसे यांचे कुटुंबीय सध्या नोकरी निमित्ताने मुंबईत स्थायिक आहेत..पण वडील निंबाजी बोरसे यांचा खास आग्रह असल्याने व जन्मभूमी असलेल्या नांदगावं तालुक्यात जर सेवा बजावता येईल तर विशेष असा आनंद होईल अशी वडीलांची इच्छा होती..त्यानुसार २०११ या वर्षी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षकपदावर त्यांची नियुक्ती झाली..आणि वडिलांच्या इच्छेनुसार आपल्या सेवेच्या माध्यमातून त्यांनी या संधीचे सोने केले..विविध समस्यांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालय हे ग्रासलेले होते.जेव्हा डॉ.रोहण बोरसे यांनी या रुग्णालयाची सूत्रे हातात घेतली तेव्हापासून ते आजतागायत त्यांनी रुग्णालयाचा चेहरा -मोहराच बदलवत एक वेगळी ओळख निर्माण केली..गरुजू रुग्णांना आपल्या खिशातील पैसे देवून पुढील उपचारासाठी मदत देखील केल्याचे अनेक उदाहरणे त्यांचे आहेत.समाजाप्रती असलेले त्यांचे प्रेम या माध्यमातून दिसून येते..अगदी मोजक्या संख्येने ग्रामीण रुग्णालयाची उपचारासाठी वाट धरणारे आज शेकडोच्या संख्येने दाखल होतात..अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने देखील हे रुग्णालय आता सुसज्ज होत आहे..ग्रामीण रुग्णालयातील माझे सर्व कर्मचारी निष्ठेने काम करतात.त्या कामाच्या प्रति निष्ठा असल्याने यश आपोआपच मिळत असते.माझ्या वडिलांनी दिलेला मोलाचा सल्ला आत्मसात करून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून काम सुरु केले.समस्त नांदगावकरांच्या सहकार्यामुळेच विविध पुरस्कारांपर्यंत मजल मारता आल्याचे श्री.बोरसे सांगत आपल्या मनाचा मोठेपणा दाखवतात..डॉ.रोहण बोरसे यांच्याविषयी शेवटी एकच म्हणावं लागत की नांदगाव तालुक्याचं आरोग्य जोपासणारा एक देवदूतच आमच्या तालुक्याला लाभला आहे..ज्या देवाने मलाही एकदा ' जीवदान ' दिलं आहे..

- संदीप जेजुरकर

  सदस्य - रुग्ण कल्याण समिती
  ग्रामीण रुग्णालय,नांदगाव ( नाशिक ) 

- ९४२३१५१०८९