...नांदगावकरांचा अखेरचा प्रवासही सुखकर नाही.
नांदगाव : संदीप जेजुरकर
'' इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...'' या कवी सुरेश भटांच्या कवितेतून माणसाचे जिवन खर तर खूपच खडतर आहे..मृत्यूनंतरच त्यातून सुटका होते याचा प्रत्यय येतो.. मात्र माणसाच्या मृत्युनंतरही सुटका नशिबी नसल्याचा प्रत्यय सध्या नगरपरिषद आरोग्य विभागाच्या अक्षम्य अशा दुर्लक्षामुळे नांदगावकरांना येत आहे.." काल ( दि.१६ ) जेष्ठ पत्रकार तथा गणेश न्यूज एजन्सीचे संचालक गजानन ( बापू ) आहेर यांच्या अंत्यविधी प्रसंगी अनुभवायास मिळाले..स्मशानभूमीत वीजपुरवठा नसल्याने गडद असलेल्या अंधारात अंत्यविधी करण्याची वेळ आहेर कुटुंबियावर आली..मोबाईलच्या फ्लॅश लाईटमध्ये अंत्यविधी उरकावा लागला.. अंत्यविधीसाठी आलेल्या अनेकांना ते खटकले सुद्धा.. अंत्यविधीप्रसंगी गेलेल्या व्यक्तीच्या चांगल्या वाईट गुणांची चर्चा करत स्मशानभूमीत निरोप दिला जातो. मात्र नांदगावच्या स्मशानभूमीची दुरावस्थेची चर्चा करत यावेळी अंत्यदर्शन करण्यात आले..वेळोवेळी समशानभूमीची स्वच्छता आवश्यक असते मात्र स्वच्छतेचा दूरदूरपर्यंत लवलेशही इथेही बघायला मिळाला नाही..अंत्यदर्शनाप्रसंगी बसण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्ये मोठमोठाले गवत उगवलेले आहे.बसण्यासाठी कमी मात्र गवताने मोठी जागा तेथे व्यापलेली आहे..परिणामी या गवतामुळे डासांचा मोठा प्रादुर्भाव स्मशानाभूमीत जाणवला.. या डासांच्या त्रासामुळे अंत्यदर्शनासाठी जमलेल्या शोकाकुल जनतेची चुळबुळ सारं काही अलबेल नसल्याचे सांगत होती..मृतदेहाला अग्नी डाग देण्यापूर्वी लाकडे रचण्यासाठी कठडे नाही. पाणी योजना तिथे राबविलेली नसल्याने अंत्यविधी प्रसंगी हातपंपावरील पाण्याचा वापर करावा लागतो.उन्हाळ्यात या हातपंपास पाणी नसल्याने देखील मोठी गैरसोय होते. कायमस्वरुपी वीज पुरवठा नसल्याने दिवाबत्तीची सोय नाही.अशा अनेक नागरी सुविधांचा अभाव या स्मशानाभूमीत जाणवतो. अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या रस्त्यावरील विवेक हॉस्पिटल मागील शाकंबरी नदीवरील पुलाची झालेली दुरावस्था देखील नसल्याचे अधोरेखित करते.नगरपरिषदेच्या विकास आराखड्यात स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शाकंबरी नदीवरील पुलाच्या कामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेले आहेत.मात्र शासन स्तरावरून निधीची मंजुरी नसल्याने पुलाचे हे काम रखडले असल्याचे समजले..दरम्यान मरणानंतरही मृदेहाला मरणासन्न अवस्था सहन करावी लागत असल्याने स्मशानभूमी दुरावस्थेकडे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
भोलेनगर स्मशानभूमीची दुरावस्था -
शहरातील भोलेनगर येथील दुसऱ्या स्मशानभूमीची अवस्था देखील अशीच आहे.. अंत्यविधी सुरु असतांना छताचा काही भाग कोसळण्याचे प्रकार देखील भोलेनगर येथील स्मशानभूमीत घडले आहे. आजही स्मशानभूमीच्या छताला तडे गेले असल्याने छत कोसळण्याची शक्यता तिथे आहे. या स्मशानभूमीच्या कामास मध्यंतरी सुरुवात झाली होती खरी मात्र सध्या हे काम थांबलेले आहे..वेळेत काम न केल्याने संबंधित ठेकेदाराला परिषदेकडून नोटीस बजावल्याचे देखील समजते.
स्मशानभूमीतील मरण यातना -
अंत्यसंस्कारप्रसंगी ठेवण्यात येणाऱ्या मृतदेहास संरक्षण कठडे देखील नाही..
* स्मशानभूमीत कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्था नाही..हातपंप आहे मात्र उन्हाळ्यात त्यास पाणी नाही..
* स्मशानभूमीत असलेल्या शौचालयाची दुरावस्था मोठे गवत त्यात वाढलेले आहे..
* अंत्यसंस्कारानंतर उरलेली रक्षा टाकण्यास जागा नसल्याने बाजूला कुठेतरी ती टाकली जाते.
* स्मशानभूमीतील कचरा ( तिरडीचे बांबू ,कपडे ) तिथेच बाजूला टाकला जात असल्याने मोठी अस्वच्छता..