भटकंती - अंकाई किल्ला...
मनमाड पासून १४ कि.मी.दूर येवला तालुका हद्दीत..
पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते भटकंतीचे..आणि भटकंती साठी योग्य ठिकाण म्हणजे गड,किल्ले व डोंगररांगा.. मागील आठवड्यात पहिला पाऊस झाला आणि आज मग अंकाई किल्ल्यावर जायचं ठरलं..सकाळी सहा वाजेपासून मग मित्रांना नेहमीप्रमाणे कॉल सुरु झाले..प्रा.शिवाजी पाटील, वनरक्षक सुनील खंदारे व लहान बंधू निखिल याने अंकाई किल्ल्यावर भटकंतीसाठी जायला होकार दर्शविला..दोन दुचाकी सोबत घेऊन सकाळी ६ : ३० वाजता नांदगाव वरून स्वारी मनमाड पासून १४ कि.मी.अंतर दूर असलेल्या अंकाई किल्ल्याच्या दिशेने निघाली.. रस्त्यात पावसाचा थोडा शिडकावा झाला..नंतर मात्र पाऊस थांबला..बरोबर ४५ ते ५० मिनिटांनी मग आम्ही अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो..दुचाकी पार्क केली आणि किल्ल्याकडे बघितले.. त्याचवेळी आमचे मार्गदर्शक प्रवीण व्यवहारे सरांना कॉल केला आणि विचारले सर कुठं आहे ? तेव्हा सर डॉ.भागवत दराडे व तुषार गोयल यांच्यासमवेत अंकाई किल्ल्यावर पोहोचलेले सुद्धा होते..म्हटलं चला आता आपल्याला निघावं लागेल नेहमीप्रमाणे थोडंसं टेन्शन आलं..हल्ली फिरणं जरा कमी झाल्याने शरीर देखील सुस्त झालेलं..पण एकदा ठरलं की मग जायचंच हा ईरादा पक्का असल्याने स्वारी निघाली...वनरक्षक खंदारे आमच्या चौघांमधील ' फिट ' माणूस..आपल्या घड्याळातील Stopwatch लावून सुसाट सुटला..आणि डायरेक्ट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ ' आठ ' मिनिटात जाऊन पोहोचला सुद्धा आणि तेथून आम्हाला हात वर करत या लवकर असा आवाज पण दिला..तोपर्यंत आम्ही रस्ताच decide करत होतो..की कोणत्या रस्त्याने जायचं..! रस्ता मिळाला आणि आम्ही मजल दरमजल करत निघालो..आमचा चालण्याचा speed मात्र हळूच होता..तरीही थोडंसं थकल्यासारखं जाणवलं की आम्ही थांबून घेत होतो..असं करत करत किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आम्ही पोहोचलो.. थोडीशी थट्टा मस्करी करत मग आमचं फोटो सेशन सुरु झालं..किल्ल्यावर पोहोचल्यानंतर सुरुवातीलाच किल्ल्याची पडझड झालेली वास्तू बघितली की मनाला वाईट वाटायचं आज मात्र सुखद धक्काच बसला..पडझड झालेल्या किल्ल्याची डागडुजी करतांना अगदी त्याच धाटणीच्या त्याच दगडांनी भिंतीचे आणि किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांचे काम सुरु होते..खूप चांगल्या प्रतीचे काम बघून मनाला समाधान वाटले..पुन्हा किल्ल्यावर चढाई सुरु झाली..अंकाई किल्ल्याच्या मध्यावर गेल्यानंतर तेथून टंकाई किल्ला व हडबीची शेंडी व स्वतःचे हि फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले..आणि पुढचा प्रवास सुरु झाला..वाटेत प्रवीण व्यवहारे सर , डॉ.भागवत दराडे व तुषार गोयल यांची भेट झाली..थोड्याशा गप्पा मारत दोन सेल्फीही खेचले..आता किल्ल्याच्या पायऱ्या संपल्या होत्या.किल्ल्यावरील दगडात कोरलेले पाण्याचे टाके व कोरीव काम बघितले..किल्ल्यावरील अगस्ती ऋषी आश्रम व तेथील मंदिरात दर्शन घेत पुन्हा पुढे चालू लागलो पाण्याचे तळे व छोटी छोटी दोन मंदिरे बघितले..आमच्या सारखे अनेक पर्यटक आज रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी किल्ल्यावर भटकंती करत होते..पुढे गेल्यानंतर मग डोंगरावर पांघरलेली मनमोहक हिरवळ लक्ष वेधू लागली..किल्ल्यावर चढतांनाचा थकवा या हिरवळीने आमच्याकडून हिरावून नेला..मस्त रमत - गमत पुढे चालतच होतो.किल्ल्याच्या शेवटच्या भागापर्यंत आम्ही पोहोचलो..तिथे ' मोठे बाबा ' या दर्ग्याच दर्शन घेतलं..तेथूनच मनमाड - येवला रस्त्यावरील विहंगम असे दृश्य नजरेत व कॅमेऱ्यात कैद केले..तर दुसऱ्या बाजूला हडबीची शेंडी ( thums up ) पण इकडे या अशी खुणावत होती..किल्ल्याचा शेवटचा टप्पा असल्याने थोडेसे ' दबंग व स्टायलिश ' फोटोसेशन तेथे केलं.वनरक्षक सुनील खंदारे , प्रा.शिवाजी पाटील व मी भिंतीवरून उड्या मारण्याचा आनंद ही याच ठिकाणी लुटला..हे सगळं टिपण्याचं काम निखिल करतच होता..मग घड्याळाकडे बघितलं आणि वेळ झाला म्हणून परतीच्या प्रवासाला लागलो..हळु हळू करत किल्ल्यावरून खाली उतरू लागलो..किल्ला उतरतांना पायाला मात्र थोडं जाणवायला लागलं..पाय उचलतांना थोडी कसरत करावी लागत होती.त्यातच पाऊस झालेला असल्याने ओलाव्यामुळे पायऱ्या निसरड्या होवून सरकण्याचे चान्सेस जरा जास्तच होते..पण तोल सावरत हळू हळू मार्गक्रमण सुरु झालं..आणि पायथ्याला पोहोचत किल्ल्याचा प्रवास थांबवला..आपल्या दुचाकीला किक मारत किल्ल्याची सफर छान झाली असे म्हणत मनमाड गाठले..मनमाड बस स्थानकाजवळील ' श्री.दत्त टी स्टॉल ' वर मस्त वाफाळलेला चहा मारला आणि मग नांदगावकडे प्रयाण केले..