Wednesday, 5 October 2022

माणूसपण ' हरवत 'चाललय..!

📌📌

 ....धकाधकीच्या जीवनात माणसाचं ' माणूसपण ' हरवत चाललंय का ? असा प्रश्न आज सारखा माझ्या डोक्यात घोंगावतोय...एकमेकांशी असलेले ऋणानुबंध कमी झाले, भेटी - गाठी दुरावल्या..नाते संबंधात दुरावा निर्माण होवू लागला.. एकमेकांवरील विश्वास वाढण्याऐवजी कमी होवू लागला..पण यात दोष कोणाला देणार..प्रत्येकाच्या मागे व्याप वाढलेला आहे, स्वतःच एक विश्व माणसाने तयार करून घेतलंय..या विश्वाच्या बाहेर तो निघायला तयार नाही.. एकाकी व एकटेपणाचे जीवन त्याला सुंदर वाटू लागले..हे सगळं करून त्यानंतर तो बाहेर पडायला बघतो, तेव्हा त्याचा आपला कुठेतरी दूर निघून गेलेला असतो..असं काहीसं सध्या माणसांच्या बाबतीत घडतंय..आपल्याकडून अनेकांना विविध अपेक्षा असतात.. माणसाने एकमेकांशी भेटावं, बोलावं , मनमुराद गप्पा माराव्यात..पण आजच्या धकाधकीच्या या जीवनात संसाराच राहट गाडगं ओढतांना होणारी दमछाक बघता हे शक्य होत नाही..पण तरीही कुठेतरी या संसाराच्या चक्रव्यूहातून माणूस बाहेर पडू पाहतो.पण त्यावर अविश्वास दाखवला जातो, त्याला समजून देखील घेतलं जात नाही..पूर्वी आणि आता अशी त्याचेशी तुलना केली जाते..माणूस जसा आहे तसाच असतो, त्यात तर काही बदल होत नाही..हा थोडा फार स्वभाव बदलतो मात्र यामध्ये कुठं एवढं आभाळ कोसळलेलं असतं..एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा देखील पूर्ण झाल्या पाहिजे असे वाटतं असलं तरी अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून एकमेकांवर रुसनं.. त्याच्याशी न बोलणं असे देखील प्रकार घडत असतात..खरं तर आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तीकडून काही अपेक्षा आपण ठेवलेल्या असतात त्या जेव्हा पूर्ण होत नाही त्यावेळी स्वाभाविकच त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात राग निर्माण होतो..परंतु समोरील व्यक्ती ही हेतू पुरस्कर आपल्याशी वागते आहे की, त्याची काही अडचण आहे हे आपण समजून घेतले पाहिजे..त्या विषयावर त्या व्यक्तीशी संवाद साधला पाहिजे, त्या व्यक्तीला त्याच्या भावनांविषयी जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं, आपल्या मनामध्ये समोरच्या विषयी असलेले गैरसमज दूर केले पाहिजे..पण हल्ली तसं होत नाही.. होतांना दिसतही नाही म्हणून माणसा - माणसांमध्ये दुरावा, अंतर निर्माण होत आहे..आज काल माणसांच्या स्वभावातही फार बदल झाले..ज्यांना आपलं म्हणाव, ज्यांच्यावर म्हणून विश्वास ठेवावा ते ही कधी कधी आपल्याशी हातचं राखून वागतात..हे सगळचं आता माणसांच्या नशिबी यायला लागलयं..पण या सगळ्या गोष्टींवर ' मंथन ' व्हायला पाहिजे..आजच्या दिवशी मनातील कटुता, राग, द्वेष, हेवे - दावे रुपी रावणाला दहन करून प्रेमाने, सद्भावणेने एकमेकांविषयी असलेला पुर्वीचाच आदर दृढ करून मनात असलेल्या नकारात्मक दृष्टीकोणावर विजय मिळवूया..आणि नव्याने आजच्या दिवशी चांगल्या भावनांचे तसेच विचारांचे सोने लुटून दसरा साजरा करूया...!
दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

- संदीप जेजुरकर,
  नांदगाव ( नाशिक )