Tuesday, 5 July 2022

#ऋणानुबंधाच्या_अशा_ह्या_गाठी...

#ऋणानुबंधाच्या_अशा_ह्या_गाठी...

....अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने २०१३ यावर्षी ' शेषनाग झील ' येथे एका अनोळखी माणसाशी मैत्री झाली..अन् त्या माणसाला तब्बल ९ वर्षानंतर पुन्हा अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने जम्मूमध्ये भेटण्याचा योग आला..अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय अशी ही भेट ठरली.

......खरं तर आमची मैत्री झाली ती अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने...साधारण वर्ष असेल २०१३ चे..अमरनाथ यात्रेमध्ये महत्वाचे मानले जाणारे मध्यवर्ती ठिकाण असलेले ' शेषनाग झिल '..( भगवान शंकराने अमरनाथ गुफेकडे जातांना आपल्या गळ्यातील शेषनाग जिथं सोडला ते ठिकाण म्हणजे शेषनाग झील..) या ठिकाणी जोगेश भारद्वाज या व्यक्तीशी थोड्या गप्पा मारतांना या अवलीयाशी ओळख झाली..मूळचे राजौरी, जम्मू येथील रहिवासी असलेला जोगेशजी जम्मू पोलिसांत कार्यरत आहे..ओळख होण्यामागचे कारणही थोडेसे वेगळेच आहे..२०१३ यावर्षी चंदनवाडी येथून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाल्यानंतर शेषनाग येथे एक मुक्काम पडला..' मोसम साफ ' ( स्थानिक वापरण्यात येणारा हा शब्द आहे ) नसल्याने दुसऱ्या दिवशीही तेथेच मुक्कामी रहावे लागणार होते..मुक्काम वाढला म्हणजे खर्चही वाढणार होता..साधारण टेंट मध्ये राहण्यासाठी २५० /- प्रती बेड पैसे वाढणार होते..म्हणून विचारून बघावं, यात्रेतील पुढचा टप्पा ' पंचतर्णी ' कडे जाता येईल का ? म्हणून गेटकडे गेलो..तर तिथे माझ्या आधीच ' आम्हाला पुढे जाऊ द्या ' म्हणून डोकं लावणारे अनेक यात्रेकरू होते..सगळ्यांची तीच अडचण होती, जी माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांची होती..तिथं हे व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तीला उत्तरे देत होते..अनेक यात्रेकरू तर आक्रमक होत त्यांच्या अंगावरही जात होते...मात्र चिडचिड न करता जोगेश शांततेत उत्तरे देत होता..सायंकाळ झाली तसे लोक आपापल्या टेंट मध्ये परतू लागले..मग मी ह्या अवलियाकडे जावून बसलो..थंडी खूप असल्याने शेकोटी सुरू झाली..अन् मी आणि जोगेश आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली..दिवसभरात कसे यात्रेकरू येतात, त्यांना काय - काय डोकं लावावे लागते, तसेच दिवसभर विचारपूस करणारेही खूप लोक असतात प्रत्येकाला समाधानकारक उत्तरे द्यावे लागतात..मोसम साफ नसल्याने यात्रेकरूंच्या जीवाला धोका होवू शकतो म्हणून आम्ही त्यांना पुढे जावू देत नाही मात्र यात्रेकरू हे समजूनच घेत नाही असे सांगताना थोडी चिडचिड होते पण ' ड्युटी ' असल्याने सर्वांना सांभाळून घेत शांतता ठेवावी लागते व नम्रपणे उत्तरे द्यावी लागतात.असे त्याने सांगितले..त्यांची व्यथा जाणून घेतल्यावर मी ही त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला..मग तर त्याने खूप काही सांगायला सुरुवात केली अन् आमची गप्पांची मैफिल पहाटेपर्यंत रंगतच गेली..सोबत ' कावा ' ( चहाचा प्रकार ) दूध, चहा हे सगळे सुरूच होते..विचारांची देवाण - घेवाण झाल्यानंतर साहजिकच मोबाईल नंबरही आम्ही एकमेकांना दिले...दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा भेटलो त्यावेळी त्यांनी सोबतच गुफेकडे दर्शनाला जावू या म्हणून आग्रह केला..मात्र पहाडी मार्गाने जातांना केवळ तीन - चार तासांत आपण पोहोचून जावू असे त्यांनी मला सांगितले, म्हटल आपल्याकडून येवढं शक्य नाही..म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो नाही..पुढच्या चार - पाच तासांत त्यांचा मला कॉल आला की दर्शन झालं म्हणून..अर्थात ड्युटीमुळे त्याला तो भाग नवीन नव्हता म्हणून ते झटपट चालत गेले..तेव्हापासून तो आजतागायत माझ्या संपर्कात आहेत आणि मीही त्यांच्या संपर्कात...आमचं नेहमी मोबाईलद्वारे बोलणे होत असते..या भागात यात्रेला यायचं म्हटल की मला जोगेशची आठवण आल्याशिवाय राहत नाही.. २०१३ नंतर अनेकदा जम्मू काश्मीरकडे येणं झालं..मात्र त्यांची ड्युटी कारण तसेच आपल्या प्रवासादरम्यान मार्ग बदलत जात असल्याने भेट होत नव्हती..यावर्षीही मी अमरनाथ यात्रेला येणार आहे असे सांगितल्याने जोगेश जी खुश झाले..संदीप सर, ये साल किसी भी हालातमे हमें मिलना है, और आपको मेरे घर आणा है..मैं आपकी कूछ भी नहीं सूनुंगा..असे त्याने सांगून टाकले..मी ही यावर्षी आपण नक्की भेटूच असे त्याला सांगितले अन् कधी भेटायचं ही तारीखही ठरली..अमरनाथ यात्रेचं शेड्युल ठरलं..अन् प्रवासही सुरू झाला, दोन रात्री आणि एक दिवस प्रवास करून जम्मूत पोहोचलो..पण प्रवासामुळे थकून गेल्याने जम्मू मधून थेट ' कटरा ' येथे हॉटेलला पोहोचलो..फ्रेश झालो..अन् मग मित्र जोगेशला ' कॉल ' केला..आणि कटरा पोहचलो असे सांगितले..मित्र थोडा नाराज झाला..आपने ये गलत किया, आप मुझे मिलने जम्मू आणेवाले थे, आप तो रुकेही नहीं असे म्हणत तो नाराज झाला..त्याच्या बोलण्यात आमच्या भेटी विषयी तळमळ दिसत असल्याने मी म्हटलं मी येतो भेटायला.. खरं तर जम्मू ते कटरा हा दिड ते दोन तासाचा प्रवास असल्याने मी येणार नाही असे त्याला वाटले..तो ही निराश होत, आप नही आयेंगे, मैने तो घरमे ही बोल दिया है..आप आणेवाले है...आणि तो ड्युटी निमित्ताने जम्मूमध्ये एकटाच राहत असतांना त्याने त्याचे आई वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी अशा सगळ्यांना त्याच्या रूमवर बोलावून घेतलं होतं..मग मीही त्याला भेटण्यासाठी कटरा येथून जम्मुकडे बसने रवाना झालो..जम्मू मधील बसस्थानक जवळ असलेल्या ' त्रिकुटा ' येथील संकुलाजवळ आम्ही भेटायचं ठरवलं..तब्बल ९ वर्षांनी आम्ही भेटणार होतो..भेटीची उत्सुकता खूप होती त्यालाही अन् मलाही..मी बसस्थानकाजवळ ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो तसा त्याला कॉल केला..अन् पुढच्या पाच मिनिटांत तो दुचाकीवर तिथे दाखल झाला.. जसं त्याने मला बघितलं तशी त्याला गाडी लावण्याची सुद्धा घाई झाली..अन् लगेचच माझ्या गळ्यात पडला..राम - भरत भेट व्हावी तशी आमची भेट झाली, दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता .केवळ एकदा भेटल्यानंतर तब्बल ९ वर्षांनी आम्ही भेटलो होतो..भेटल्यानंतर आम्ही मग दुचाकीवरून त्याच्या घराकडे मार्गस्थ झालो..३ किलोमीटरच्या प्रवासात घरच्यांची त्याने आपुलकीने व आस्थेने चौकशी केली..अगदी जवळच्या माणसांसारखी... भगवती नगर येथे त्याच्या घरी पोहोचलो..घरी पोहोचल्यानंतर सर्व प्रथम त्याची मुलं जवळ आली, अन् ' अंकलजी नमस्ते ' करत माझ्या पायाकडे झुकले...एवढ्या कमी वयात त्यांचेवर किती चांगले संस्कार झालेले आहे हे पाहून मन भारावून गेले..दरवाजात पाय टाकताच जोगेशचे आई - वडील भेटले, त्यांचं पहिलं वाक्य हे होतं की, बेटा आणे मे कोई दिक्कत तो नहीं आयी..चलो अब फ्रेश हो जाओ... औंर आरामसे बैठो अपनाही घर समझो..घरात बसल्यावर लगेचच जोगेशची पत्नी पाणी आणि थंड शरबत घेवून समोर उभी राहिली..कैसे हो भैय्या, घर में सब ठिक - ठाक चल रहा है ना..असे म्हणत तिनेही चौकशी केली..मग सगळे एकत्र बसून गप्पा सुरू झाल्या..काही आपले शब्द त्यांना कळत नव्हते, तर त्यांचे काही शब्द मला कळत नव्हते..पण जोगेश आमचा मीडियेटर म्हणून आमच्यामध्ये दुवा साधत होता..जोगेशचे वडील ओमप्रकाशजी हे सुभेदार म्हणून सेवा निवृत्त झालेले..त्यांनी देशभरातील अनेक राज्यात सेवा बजावली असल्याचे अभिमानाने सांगत होते..महाराष्ट्रात मुंबई आणि देवळाली येथे देखील सेवा काळात येणं झालं होत असे सांगितले..गप्पांची मैफिल उत्तरोत्तर रंगत असतांनाच जोगेशच्या पत्नीने आवाज दिला..बाते बाद में करो पहले खाणा खालो.. जोगेशच्या वडिलांनी आपल्या सुभेदारी काळात काय - काय काम केले हे सांगत थोडेसे औषध देखील घेतले..मग काय घरातील होम थिएटरवर ' किशोर कुमार' चे गाणे लावा म्हणून फर्मान सोडले ..आणि किशोरदाच्या गाण्याबरोबरच सुग्रास अशा जेवणालाही सुरुवात झाली..काय जेवणार हे न विचारताच जोगेशने ' चिकन ' ची व्यवस्था करून ठेवली होती..जेवणावर यथेच्छ ताव मारल्यानंतर पुन्हा गप्पांची मैफिल रंगली, जोगेशचा मुलगा गर्व याने माझ्यासोबत एक व्हिडिओ देखील तयार केला.तसेच संपूर्ण कुटुंबीयांनी माझ्यासमवेत फोटोही घेतले..मला निघायचं आहे असे सांगितल्यावर पूर्ण फॅमिलीच भावूक झाली, अरे अभी तो आये हो..अब दो - चार दिन यही रुकना..जोगेश तुम्हे पुरा जम्मू घुमा के लायेगा..असे म्हणत मला तिथेच थांबण्याचा आग्रह करू लागले, घरातील मुलही अंकल रुक जावो ना चा नारा लावून होते..पण शेड्युल ठरलेले असल्याने व इतर सगळे मित्र मी कटरा येथे थांबविले असल्याने मला जावे लागणार होते..मग मी त्यांची परवानगी घेवून निघालो, संपूर्ण कुटुंब मला घराबाहेर सोडण्यासाठी आले..जोगेशजी ने दुचाकीला किक मारली अन् आम्ही पुन्हा जम्मूच्या दिशेने निघालो..पुढे जावून जोगेशने मला दुचाकी चालवायला दिली. मग आम्ही दुचाकीवर जम्मुची सैर करू लागलो..जम्मू बस स्थानकावर पोहोचल्यानंतर मी जातो असे सांगून जोगेशचा निरोप घेतला मात्र गाडीत बसून मी परतेल असे म्हणत जोगेश मला गाडीत बसून देईपर्यंत तिथेच थांबला..गाडीत बसवलं मगच तो परतीच्या प्रवासाला निघाला..रात्री उशीर झाल्याने गाडी कटरा येथे पोहोचेपर्यंत सारखं काळजीपोटी कॉल करून तो मला विचारत होता.मध्यरात्री एक वाजता मी हॉटेलात पोहोचल्यानंतर सुखरूप पोहोचलो म्हणून त्याला सांगितल्यानंतर मग तो निवांत झोपला.. खरं तर अशी मैत्री करणारी व जोपासणारी माणसं फार दुर्मिळच..केवळ एका भेटीत एवढा विश्वास दाखवत एवढा चांगला पाहुणचार व घरातली माणसंही एवढ्या आदबिने माझ्याशी वागली..खूप छान वाटलं अगदी मनाला भावून गेलं..आणि हा महाराष्ट्र भेटीचं आवतंन देवून पुढची भेट लवकरच घेवू असंही ठरलं बरं का..

संदीप जेजुरकर
नांदगाव ( नाशिक )