Saturday, 15 February 2020

...अन तो सैन्यात भरती झाला.. मोलमजुरी करणाऱ्या अविनाशची प्रेरणादायी कहाणी..


...अन तो सैन्यात भरती झाला.. 
मोलमजुरी करणाऱ्या ' अविनाश ' ची प्रेरणादायी कहाणी..
     
- संदीप जेजुरकर, नांदगाव
           
         पाचवीलाच पूजलेल्या गरिबीमुळे एकवेळच्या जेवणाची देखील भ्रांत असायची..त्यातचं वडिलांचं छत्र हरपलं..अन ' अविनाश ' वर कुटुंबाचा ' भार ' पेलवण्याची जबाबदारी आली..कधी विटभट्टीच्या ट्रॅक्टरवर..सिमेंटच्या मालधक्क्यावर.तर कधी गवंड्याच्या हाताखाली काम करत कुटुंबाचा चरितार्थ अविनाश चालवत होता..हे सगळं करत असतांना त्याने देशसेवा करायची व सैन्यात भरती व्हायचं अस स्वप्न उराशी बाळगलं होतं आज ते स्वप्न सत्यात साकार झालं..एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या ' अविनाश ' ची ही धडपड अनेक तरुणांना प्रेरणादायी ठरेल..शहरातील ढासे मळा परिसरात राहणाऱ्या शिंदे कुटुंबीय अत्यंत हालाखीचे दिवस काढून जगत होतं..त्यातच कुटुंबाचा कर्ता असलेला अविनाशचा बाप संजय शिंदे हे आजरपणाने वारले..वडिलांचं छत्र हरपल्याने कुटुंबियांची जबाबदारी ' आई ' वर पडली..मोलमजुरी करून ती माऊली कुटुंब सांभाळू लागली..मुलं मोठे करायचे त्यांना शिक्षण द्यायचं हा विचार करत एकट्या आईची धावपळ सुरू होती..आईची धावपळ बघून आईला घरात मदत करावी म्हणून अविनाश व त्याचा लहान भाऊ दोघेही गवंड्याच्या हाताखाली काम करू लागले..एवढ्या लहान वयात मुलं मजुरी करताय हे आईला बघवत नव्हतं..पण परिस्थितीपुढे हतबल असलेल्या त्या आईने पोरांनो कामाबरोबर शिक्षण घ्या असा तिचा आग्रह असायचा..आयुष्यभर कष्ट करून आपले दिवस निघणार नाही असंघरातील मोठा असलेला ' अविनाश ' ला जाणवलं आणि मग त्याने सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची असं स्वप्न त्याने उराशी बाळगलं...आणि त्या दिशेने त्याचा प्रवास सुरु झाला..दिवसभर सिमेंट वाळूचे कामे करून सायंकाळी मैदानावर जावून सैन्य भरतीला अनुसरून तीन - तीन तास व्यायाम करायचा..त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यासही करायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला..अविनाशचा लहान भाऊ देखील त्याला या कामात मदत करायचा..हिसवळ येथील ज्ञानेश्वर बोगीर यांची त्याला मोलाची साथ मिळाली तांत्रिकदृष्ट्या त्यांनी अविनाशला सैन्य भरतीचे बाळकडू दिले..सुरुवातीला दोन ते तीन सैन्य भरत्यांमध्ये त्याला अपयश आले पण उराशी जिद्द बाळगलेलीच होती त्या दृष्टीने त्याने प्रवास सुरूच ठेवला आणि मुंबई येथील मुंब्राच्या मैदानात त्याने ' फिजिकल ' चे मैंदानही मारले..त्यानंतर लेखी परीक्षा दिली.. निकाल काय येतो याची उत्सुकता त्याला होतीच पण याही काळात त्याच रोजचं गवंड्याच्या हाताखाली काम करण्याचे ' रुटीन ' सुरूच होतेे..काल जेव्हा '  निकाल ' कळाला तेव्हा देखील अविनाश कामावरच होता..मित्राचा कॉल आला की तुझा सैन्य भरतीचा निकाल लागला आणि तू पास झाला..हे ऐकताच अविनाशला तर आभाळच ठेंगनं झालं..हे ऐकतांना अंगावर शहारे येत होते असं त्याने सांगितलं..आईला निकाल ऐकवला व पेढा भरवतांना दोघांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या..पोरांचा बाप गेल्यापासून पोर कष्ट उपसताय खूप हलाखीचे दिवस काढत इथपर्यंत पोरांनी ओढून आणलं याचा मला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रीया अविनाशच्या आईने पदराने डोळे पुसतांना दिली..

- संदीप जेजुरकर
  नांदगाव ( नाशिक )