Sunday, 5 July 2020

...अशी झाली इंद्रायणी किल्ल्याची भटकंती

....अशी झाली इंद्रायणी किल्ल्याची भटकंती..
      - संदीप जेजुरकर, नांदगांव ( नाशिक )

घनदाट झाडी, निर्मनुष्य रस्ता , त्यातच दाट धुकेही अन आमचा रस्ता चुकलेला..किल्ला कसा शोधायचा या विवंचनेत असतांनाच माणसांचा आवाज कानी आला..त्या आवाजाच्या दिशेने पुढे सरकत असतांनाच किल्ल्यावर जाण्याचा मार्ग मिळाला..या दरम्यान, थोडीशी भीती आणि थरारही अनुभवला..

       निसर्गसौंदर्य खुललं की कुठेतरी भटकंतीला निघायचं हे आमचं नेहमीचंच ठरलेलं..सुटीचा दिवस बघायचा आणि घराबाहेर पडायचं..पण भटकंतीतही किल्ल्यालाच आमची प्रथम पसंती असते..कारण किल्ल्यावरील ऐतिहासिक माहितीचा ठेवा , हिरवाईने नटलेलं निसर्ग सौंदर्य , आणि किल्ल्यावर चढाई करतांना लागणारी शारीरिक मेहनत या तिन्ही गोष्टी साध्य होतात.. भटकंतीसाठी यापूर्वी न बघितलेला सह्याद्रीच्या कुशीतील सातमाळ डोंगररांगेमधील  इंद्रायणी किल्ला ( चांदवड जि. नाशिक ) निवडला..अन पहाटेच नांदगावहून मित्र प्रा.शिवाजी पाटील , मंगलसिंग सोनवणे अन मी ( संदीप जेजुरकर ) असे तिघेजण दुचाकीवरून निघालो.. चांदवडहुन सुनील खंदारे व गोपाल राठोड यांना सोबत घेऊन किल्ल्याकडे प्रस्थान केले.वडबारे गावातून किल्ल्याकडे जाणारी वाट धरली आणि आमचा प्रवास मातीच्या रस्त्यावरून सुरु झाला..दूरपर्यंत खडतर अशा रस्त्यावरून उंचावर दुचाकीने गेल्यानंतर आपण रस्ता चुकलो असे वाटायला लागले.कारण किल्ल्याकडे जाणारे कोणीच दिसत नव्हते ना गाड्या दिसत होत्या..आणि आम्हीही पहिल्यांदाच या किल्ल्यावर जात होतो..मात्र उंचावर गेल्याने दाट धुके, थंडगार वारा, थोडीशी पावसाची बुरुबुर सगळं काही थंड - थंड असे वातावरण तयार झाले होते..त्याच वातावरणाचा आनंद घेत चांदवड पोलीस व आमचे मित्र बिन्नर भाऊ यांना कॉल करून रस्त्याची माहिती विचारली त्यांनीही रस्ता चुकला असल्याचे सांगितले.आता काय करायचं या विवंचनेत असतांनाच गोपाल राठोड यांनी सांगितलं की या  इंद्रायणी किल्ल्यावर जाण्यासाठी वेगवेगळे तीन रस्ते असल्याचे सांगत आपण जात असलेला रस्ता देखील बरोबर आहे आपण निघुया म्हणत आणखी पुढे जायला निघालो..सगळीकडे धुके पसरलेले असतांना हिरवळीमधून केवळ एक पायवाट शोधायची आणि त्या दिशेने वाटचाल करत पुढे निघालो कारण आजूबाजूला धुक्यामुळें काहीच दिसत नव्हतं..दुरपर्यंत प्रवास केल्यानंतर एका निर्जन ठिकाणी दुचाकी थांबवल्या..मात्र धुकं खूप जास्त असल्याने कुठेही किल्ल्याचा मागमूस दिसत नव्हता..आलोच आहे तर किल्ला शोधायचाच हा चंग बांधला आणि बाजूच्या घनदाट झाडी असलेल्या डोंगरावर चढाई सुरू झाली जिथे रस्ताच नव्हता..बघता - बघता दोन मोठं मोठे डोंगर पार करून गेलो मात्र तरीही किल्ला दिसत नव्हता..काय करावं कळत नव्हतं तरीपण आलोच आहे तर किल्ल्याचे दर्शन घेऊनच जायचं ठरवलं होतं म्हणून पुन्हा पायवाट शोधत पुढे निघालो..काही अंतर कापल्यानंतर दोन माणसांमध्ये सुरू असलेला संवाद कानावर पडला..मग आमच्याही जीवात जीव आला.आणि आम्ही आरोळी ठोकत त्यांना आम्हाला किल्ल्यावर यायचं आहे रस्ता कुठून आहे असे विचारलं त्यांनीही केवळ सरळ पायवाटेने या एवढं सांगितलं..म्हणजे आम्ही निवडलेला मार्ग योग्य होता याची खात्री झाली आणि पुढे निघालो.समोरून येणाऱ्या आवाजाच्या दिशेने वाटचाल करत असतांना समोर एक मोठा डोंगर दिसला हाच किल्ला असावा म्हणून आम्ही त्या दिशेने पुन्हा वाटचाल सुरू केली थोडंस धुकं कमी झाल्यावर बघितलं असता किल्याचा पहिल्या पायरीवरच आम्ही जाऊन पोहोचलो होतो..किल्ला दिसत नसतांना आणि  रस्ताही भटकलेलो असतांना जी मनात भीती होती ती किल्लाची पहिली पायरी बघितल्यावर क्षणार्धात निघून गेली..दोन डोंगरात कोरलेल्या १०० तेे १२५ पायऱ्या लक्ष वेधून घेत होत्या.त्यातील पहिल्याच पायरीवर बसून थोडीशी विश्रांती घेत पुढे निघालो..पायऱ्या चढून गेल्यानंतर सगळीकडे हिरवळ आणि धुके दिसत असतांना त्या धुक्याचा आनंद घेत असतांना चांदवडचे मित्र बिन्नर भाऊ व त्यांची संपूर्ण टीम किल्ला उतरून खाली येतांना भेटली..मस्त गप्पा झाल्या.किल्ल्यावर काय बघायचं हे त्यांनी सांगितलं आणि आम्ही पुन्हा पुढे चालू लागलो.किल्ल्यावरील धुक्यांमुळे रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने किल्ल्यावरील भगवान शंकराच्या मंदिराचा मॅप लावून चालू लागलो..हळू हळू किल्यावरील भग्नावस्थेत असलेल्या काही वास्तू दिसू लागल्या..योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे असे समजून तेथील कोरीव दगडांचे छायाचित्र टिपत पुढे मार्गस्थ झालो..बिन्नर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे एक शेततळ्यासारखे कोरीव तळे दिसले मात्र दोन डोंगर पार करून गेल्यावरही मंदिर मात्र दिसेना.. पुन्हा मॅपची मदत घेत पुढे निघालो..चालत चालत थेट किल्ल्याच्या टॉपवर जाऊन पोहोचलो. मॅपवर पुन्हा बघितले असता मंदिर क्रॉस करून पुढे आल्याचे त्यात दर्शविले..आम्ही जिथे पोहोचलो तिथे एका छोटीशी दर्गा व काही दगड दिसले..दर्ग्याजवळील हिरवा झेंडा खाली पडलेला असल्याने आम्ही तो व्यवस्थित केला आणि तेथील थंड व जोराने वाहत असलेल्या हवेचा आनंद घेतला.तेथून खाली बघितले असता अतिशय खोल अशी दरी दिसत होती.. किल्ल्यावरील मंदिर शोधायचं असा चंग बांधून मंदिर शोधायला सुरुवात केली.मात्र मंदिर काही सापडेनाचं..बिन्नर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे दुसरी एखादी वास्तू सापडेल म्हणून ती शोधू लागलो पण ती ही खूप दूरपर्यंत चालून गेल्यावर सापडलीच नाही.आता काय करायचं या विवंचनेत असतांनाच हिरव्या गार झाडींमध्ये डोंगराची काळी मैना म्हणून ओळखली जाणारी करवंदाच्या जाळ्या दिसल्या..मग काय झाडावरील ताज्या आणि जिभेचे चोचले पुरविणाऱ्या करवंदाचा आस्वाद घेऊन पुन्हा मंदिर शोधू लागलो..गोपाल राठोड आणि मंगलसिंग सोनवणे यांनी चालण्याचा वेग वाढवून मंदिर शोधण्यास सुरुवात केली आणि मंदिर शोधलेही..आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेत दगडात कोरलेल्या मंदिराच्या भिंती खांब आदी मोबाईलमध्ये कैद केले.दर्शन झाल्यानंतर आलेला संपूर्ण थकवा दूर पळून गेला आणि आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो..परतत असतांना पुन्हा आमची वाट चुकली..किल्ल्यावरून खाली कसं जायचा हेच समजेना.. आम्ही पाचही जण किल्ल्यावरून खाली जाण्याचा रस्ता शोधू लागलो पण रस्ता काही सापडेना..पुन्हा मॅपची मदत घेतली तरीही लक्षात येईना..अशातच डोक्यात वीज चमकून गेली की पूर्वीच्या काळात शत्रूंना चकवा देण्यासाठी असे काही मार्ग केले असावे ज्यामुळे किल्ल्यापर्यंत पोहचण्यास शत्रूंना अडचण होईल..आणि त्यांच्या काही हालचाली बदलल्यास त्यांना ताब्यात घेतले येईल असे मनोमनी वाटले.मंगलसिंगने ही तशी जाणीव करून दिली की आपल्यालाही चकवा बसला आहे..आता काय करायचं..? किल्ल्यावरून उतरायचा रस्ता कुठे शोधायचा असा विचार करत बसलो..धुकेही कमी होत नव्हतं म्हणून काहीच दिसत नव्हतं..या धुक्यातच आम्ही रस्ता शोधण्यासाठी तब्बल दीड ते दोन तास घालवले..पण रस्ता काही सापडेनाचं..तेवढ्यात एका भग्नावस्थेतील चौथऱ्यावर फोटो काढलेली जागा मला दिसली..आणि लगेचच रस्ता आठवला..पण मी सांगितलेला रस्ता चुकीचा आहे असे म्हणून कोणीही मान्य करत नव्हतं..परंतु मग सुनील खंदारे आणि शिवाजी पाटील यांना रस्ता बघून या म्हणून थोडे पुढे पाठवले असता किल्ल्यावरुन खाली उतरण्याचा मार्ग सापडला आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.हळूहळू किल्ल्याच्या पायऱ्या उतरत रस्ता शोधण्यात आलेल्या अडचणी आणि चुकीचा मार्ग बरोबर आहे असे म्हणणाऱ्या सहकाऱ्यांची टिंगल टवाळी करत आम्ही पुन्हा किल्ल्याच्या पहिल्या पायरीपाशी पोहोचलो..ज्या ठिकाणी दुचाकी लावल्या होत्या त्या ठिकाणाजवळ एक मंदिर होते.ती खूण लक्षात ठेवून मग आम्ही हळूहळू किल्ल्यावरून खाली उतरत आमच्या दुचाकी पर्यंत पोहोचलो आणि आमच्या घराच्या दिशेने रवाना झालो.मात्र पुढील रविवारी दुसऱ्या किल्ल्यावर जायचं हे ठरवूनचं...

- संदीप जेजुरकर
   नांदगांव ( नाशिक )


Saturday, 15 February 2020

...अन तो सैन्यात भरती झाला.. मोलमजुरी करणाऱ्या अविनाशची प्रेरणादायी कहाणी..


...अन तो सैन्यात भरती झाला.. 
मोलमजुरी करणाऱ्या ' अविनाश ' ची प्रेरणादायी कहाणी..
     
- संदीप जेजुरकर, नांदगाव
           
         पाचवीलाच पूजलेल्या गरिबीमुळे एकवेळच्या जेवणाची देखील भ्रांत असायची..त्यातचं वडिलांचं छत्र हरपलं..अन ' अविनाश ' वर कुटुंबाचा ' भार ' पेलवण्याची जबाबदारी आली..कधी विटभट्टीच्या ट्रॅक्टरवर..सिमेंटच्या मालधक्क्यावर.तर कधी गवंड्याच्या हाताखाली काम करत कुटुंबाचा चरितार्थ अविनाश चालवत होता..हे सगळं करत असतांना त्याने देशसेवा करायची व सैन्यात भरती व्हायचं अस स्वप्न उराशी बाळगलं होतं आज ते स्वप्न सत्यात साकार झालं..एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या ' अविनाश ' ची ही धडपड अनेक तरुणांना प्रेरणादायी ठरेल..शहरातील ढासे मळा परिसरात राहणाऱ्या शिंदे कुटुंबीय अत्यंत हालाखीचे दिवस काढून जगत होतं..त्यातच कुटुंबाचा कर्ता असलेला अविनाशचा बाप संजय शिंदे हे आजरपणाने वारले..वडिलांचं छत्र हरपल्याने कुटुंबियांची जबाबदारी ' आई ' वर पडली..मोलमजुरी करून ती माऊली कुटुंब सांभाळू लागली..मुलं मोठे करायचे त्यांना शिक्षण द्यायचं हा विचार करत एकट्या आईची धावपळ सुरू होती..आईची धावपळ बघून आईला घरात मदत करावी म्हणून अविनाश व त्याचा लहान भाऊ दोघेही गवंड्याच्या हाताखाली काम करू लागले..एवढ्या लहान वयात मुलं मजुरी करताय हे आईला बघवत नव्हतं..पण परिस्थितीपुढे हतबल असलेल्या त्या आईने पोरांनो कामाबरोबर शिक्षण घ्या असा तिचा आग्रह असायचा..आयुष्यभर कष्ट करून आपले दिवस निघणार नाही असंघरातील मोठा असलेला ' अविनाश ' ला जाणवलं आणि मग त्याने सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची असं स्वप्न त्याने उराशी बाळगलं...आणि त्या दिशेने त्याचा प्रवास सुरु झाला..दिवसभर सिमेंट वाळूचे कामे करून सायंकाळी मैदानावर जावून सैन्य भरतीला अनुसरून तीन - तीन तास व्यायाम करायचा..त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यासही करायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला..अविनाशचा लहान भाऊ देखील त्याला या कामात मदत करायचा..हिसवळ येथील ज्ञानेश्वर बोगीर यांची त्याला मोलाची साथ मिळाली तांत्रिकदृष्ट्या त्यांनी अविनाशला सैन्य भरतीचे बाळकडू दिले..सुरुवातीला दोन ते तीन सैन्य भरत्यांमध्ये त्याला अपयश आले पण उराशी जिद्द बाळगलेलीच होती त्या दृष्टीने त्याने प्रवास सुरूच ठेवला आणि मुंबई येथील मुंब्राच्या मैदानात त्याने ' फिजिकल ' चे मैंदानही मारले..त्यानंतर लेखी परीक्षा दिली.. निकाल काय येतो याची उत्सुकता त्याला होतीच पण याही काळात त्याच रोजचं गवंड्याच्या हाताखाली काम करण्याचे ' रुटीन ' सुरूच होतेे..काल जेव्हा '  निकाल ' कळाला तेव्हा देखील अविनाश कामावरच होता..मित्राचा कॉल आला की तुझा सैन्य भरतीचा निकाल लागला आणि तू पास झाला..हे ऐकताच अविनाशला तर आभाळच ठेंगनं झालं..हे ऐकतांना अंगावर शहारे येत होते असं त्याने सांगितलं..आईला निकाल ऐकवला व पेढा भरवतांना दोघांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या..पोरांचा बाप गेल्यापासून पोर कष्ट उपसताय खूप हलाखीचे दिवस काढत इथपर्यंत पोरांनी ओढून आणलं याचा मला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रीया अविनाशच्या आईने पदराने डोळे पुसतांना दिली..

- संदीप जेजुरकर
  नांदगाव ( नाशिक )