Thursday, 7 November 2019

अहो...' सरकार ' कधी स्थापन करणार ?

अहो...' सरकार ' कधी स्थापन करणार..?

           विधानसभेच्या निवडणुका झाल्या..या निवडणुकीत भाजप -  शिवसेना व मित्रपक्षांकडे महाराष्ट्रातील तमाम जनतेने कौल दिला..विजयी जल्लोषही करण्यात आला..पत्रकार परिषद  घेऊन जनतेचे आभार मानण्यात आले..लवकरच महायुतीचं सरकार या राज्यात स्थापन होईल असं वाटतं असतांना मात्र आज १५ दिवस उलटून गेले , विधानसभेची मुदतही आज संपणार असतांना या राज्यात सरकार मात्र स्थापन झालेलं नाही..कारण काय तर लोकसभा निवडणुकीच्या आधी मित्रपक्षांच्या जागा ठरवून उरलेल्या जागेत भाजप आणि शिवसेना यांनी फिफ्टी - फिफ्टी जागा लढवायच्या..सत्ता आली तर सत्तेतील पदांमध्ये समसमान वाटप करायचे असा फॉर्म्युला ठरला होता..असे शिवसेनेकडून सांगत सरकार स्थापनेसाठी आपला प्रस्ताव भाजप पुढे शिवसेनेने ठेवला..मात्र शिवसेनेला गृहीत धरलेल्या भाजप कडून या बद्दल काहीच रिप्लाय आला नाही.उलट मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं काहीच ठरलेलं नव्हतं ' असं एका अनौपचारिक गप्पांमध्ये जाहीर केलं..त्यामुळे झालं काय तर शिवसेनेचा स्वाभिमान ' इगो ' दुखावला गेला..आणि शिवसेनेकडून मग सामनाचे संपादक खासदार संजय राऊत पुढे आले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री पदाची मागणी करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचेसोर जे ठरलं त्यावर भाजपाने बोलावं असं ठणकावून सांगितलं..त्यानंतर श्री.राऊत यांनी जशी संधी मिळेल तस मित्रपक्ष भाजपाला चांगलेच धारेवर धरले..या दरम्यान, भाजपाची मात्र चांगलीच गोची झाली..भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आदींनी शिवसेनेचे चिमटे काढत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देवून सरकार महायुतीचंच येणार हे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला..नुसता ठरला नव्हे तर तो संजय राऊत यांनी हाणून पाडला..राज्याच्या राजकारणात एकीकडे बलाढ्य असलेली भाजपा  या संजय राऊतांपुढे मात्र हतबल झाली..नुसती हतबल झाली नाही तर सपशेल लोटांगण घालायला पण आता तयार आहे..जनतेच्या मते मागील पाच वर्षांपासून सुरु असलेली शिवसेनेचे झालेली फरफट व त्याचा बदला अवघ्या पंधरा दिवसाच्या काळातच संजय राऊत यांनी घेतला असं बोलल्या जात आहे..गगनाला हात लावणाऱ्या भाजपाला पुन्हा एकदा जमिनीवर आणण्याचे काम संजय राऊत यांनी केलं..कायमच शिवसेनेला या ना त्या कारणावरून ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांनीही भाजपाला ट्रोल करीत शिवसेनेच्या बाजूने मत मांडण्यास सुरुवात केली आणि शिवसेनेने दाखविलेल्या भूमिकेबद्दल कौतुक केले..आता सध्या काय सुरु आहे तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व किंगमेकर च्या भूमिकेत असलेले मा.शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे..राजकारणाला कलाटणी देणारं व्यक्तिमत्व आणि काहीतरी धक्कादायकच निर्णय घेवून आपले बुद्धीचातुर्य अबाधित ठेवत राजकारणात आपणच ' पावरफुल ' असल्याचे दाखवून देणारे श्री.पवार हे याप्रसंगी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे..असो
मी तर एवढंच म्हणेल राज्यातील शेतकरी जो यापूर्वी कोरड्या दुष्काळाने होरपळला होता तो यंदा मात्र ओल्या दुष्काळाने होरपळलेला आहे त्या शेतकरी राजाला लवकरात लवकर मदत व्हावी यासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी लवकर सरकार स्थापन व्हावं हीच तमाम महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे..

या सगळ्या घडामोडीत मला असं वाटतं की,...

• भाजपने जर बहुमताचा दावा केला तर ते बहुमत सिद्ध करू शकणार नाही..मात्र शिवसेनेने बहुमताचा दावा केला तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्याने शिवसेना बहुमत सिद्ध करेल..

• जर भाजप - शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्यात भाजपाच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद दिलं तर त्या पदावर देवेंद्र फडणवीस नसतील...

• अडीच - अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं तर त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री हा पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळेल..

• चार महत्वाच्या खात्यांपैकी दोन खाते शिवसेनेकडे असतील..

• शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून राज्यात सरकार स्थापन होऊ शकत त्याला काँग्रेस बाहेरून पाठींबा देईल..

• सत्तेपासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी वेळेप्रसंगी राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री म्हणून मा.शरद पवार देखील बसू शकतात त्यास शिवसेना अटी शर्ती ठेवून पाठींबा देईल..

• राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही..असंही मला वाटतं

ता.क. - राज्यातील घडामोडींवर लिहिण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने आपल्या प्रतिक्रिया व सूचना अपेक्षित आहे..

- संदीप जेजुरकर,नांदगाव ( नाशिक )
   - ९४२३१५१०८९